मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन आक्रमक झाले असून गंगापूर खुलताबाद मतदार संघाची भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांची गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. गंगापूर खुलताबाद मतदार संघाची भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांकडून फोडण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण आलं आहे. सरकार मराठा आरक्षणासंबंधी कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण, सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय.
दरम्यान, राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक होत असताना राज्य सरकार देखील सतर्क झालेलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील आणि नाशिक मधील निवासस्थानाचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा लोकसभा सचिवालयानं स्वीकारला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News