Nagpur SBL Factory Blast: राऊळगावमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दुर्गा शेवतकर यांचा मृत्यू झाला.
राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये झालेल्या भीषण स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दुर्गा यांच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अपयशी ठरला. या निधनामुळे एसबीएल स्फोटातील एकूण मृतांची संख्या आता २० झाली आहे.
दुर्गा शेवतकर यांची कौटुंबिक कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. त्या मूळच्या धामणा येथील असल्या तरी रोजगारासाठी कोंढाळी येथे भाड्याच्या घरात राहात होत्या. विशेष म्हणजे, दुर्गा यांच्यासह त्यांची बहीण छाया आणि लहान भाऊ ज्ञानेश्वर हे तिघेही स्फोटक निर्मितीच्या कारखान्यांमध्ये कामाला होते. बहीण आणि भाऊ सोलर एक्स्प्लोझिव्हमध्ये कार्यरत आहेत, तर दुर्गा एसबीएलमध्ये नोकरीला होत्या. ज्या स्फोटकांनी घराची चूल पेटवली, त्याच स्फोटकाने एका बहिणीचा घास घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गा यांचे पती केशव शेवतकर हे मजूर आहेत, तर त्यांची दोन मुले विशाल आणि गौरव मिळेल ते काम करून रोजंदारीवर घर चालवण्यास हातभार लावतात. आपल्या मुलांचे भविष्य उजळावे, यासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता दुर्गा या कारखान्यात राबायच्या. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन्ही मुलांच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरपले आहे.
Nagpur Purvesh Duragkar : भारतीय वायुसेनेचं लढाऊ सुखोई विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर शहीद
शुक्रवारी रुग्णालयात दुर्गा यांचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांचे मोठे भाऊ जगदीश चिखले यांच्या स्वाधीन करण्यात आला. शिरपूर (भुयारी) धामणा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांना आपले अश्रू अनावर झाले होते. या भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर २२ कामगारांवर अद्यापही ऑरेंज सिटी आणि ए स्क्वेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. एकापाठोपाठ एक कामगारांचे जाणारे बळी प्रशासकीय यंत्रणा आणि कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
IAS Transfer : नागपूर मनपा आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर; अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बदली
दुःख, रोष, संतापही…
दुर्गा शेवतकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारावेळी तेथे उपस्थित प्रत्येकाच्या मनात हळहळ होती. आप्त, नातेवाईक आणि परिचितांनी साश्रूनयनांनी दुर्गा यांना अखेरचा निरोप दिला. कामगारांच्या जिवाशी आणखी किती खेळ होणार, असा सवाल येथे उपस्थित काही नागरिकांनी उपस्थित केला. कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या सुरक्षेविषयी पावले उचलली जावीत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली
