• Sat. Sep 21st, 2024
मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी माजलगाव नगर परिषद पेटवली

बीड : बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचं घर जाळल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा माजलगाव नगर परिषदेकडे वळवला आहे. काही वेळापूर्वी आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेत घुसून तिथे जाळपोळ केली. त्यामुळे इमारतीला मोठी आग पाहायला मिळत आहे. तसेच परिसरात धुराचे लोट देखील दिसत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलनकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर असलेल्या गाड्याही आंदोलकांनी जाळल्या. सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे. मराठा आंदोलक आणि सोळंके यांच्यातील एका फोन कॉलनंतर आंदोलक सोळंके यांच्या घरी चाल करून गेले. त्यानंतर आंदोलकांनी सोळंके यांचं घर पेटवून दिलं. या घटनेला तास-दोन तास होत नाहीत तोच आंदोलनकर्त्यांनी माजलगाव नगर परिषदेचं कार्यालय पेटवून दिलंय.

अजितदादा गटातील आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्लाबोल; गाडीची जाळपोळ, अख्खा बंगलाच पेटला
सोळंके यांचं घर पेटवणारा जमाव थेट माजलगाव नगर परिषदेत पोहोचला. याच जमावाने नगर परिषदेत जाळपोळ केली. सध्या इमारतीला मोठी आग पाहायला मिळत आहे. तसेच परिसरात धुराचे लोटही दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या माजलगाव शहरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अर्धवट क्लिप काढून फिरवली, विश्वास ठेवू नका : प्रकाश सोळंके

मी देखील मराठा समाजाचा आमदार आहे, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. कोणीतरी अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असं आवाहन सोळंके यांनी केलं.

गाडी जाळली, घर फोडलं, हीच ऑडिओ आमदार सोळंके यांना महागात पडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed