• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाने आयुष्य संपवलं, नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार, मृतदेह तहसील कचेरीत

    लातूर : राज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन चांगलंच चिघळताना दिसत आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वंजारवाडा येथील माजी सरपंच व्यंकट नर्सिंग ढोपरे यांनी पुण्यात आपल्या मुलाकडे गेले असता आळंदी येथील इंद्रायणीत उडी मारून शुक्रवारी आत्महत्या केली. आता व्यंकट ढोपरे यांचा मृतदेह शिरूर अनंतपाळ तहसील समोर ठेवण्यात आला आहे.

    व्यंकट ढोपरे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांसह सकल मराठा समाजाने घेतली आहे. आळंदीवरून ज्या रुग्णवाहिकेत हा मृतदेह आणण्यात आला आहे, ती रुग्णवाहिका सुद्धा थांबवून घेण्यात आली आहे. शिवाय शिरूर अनंतपाळ शहर बंदची हाकही देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक जण शिरूर अनंतपाळ तहसील समोर एकत्र जमले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. व्यंकट ढोपरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे.

    मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल; माजी सरपंचाची पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी
    ढोपरे यांनी चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय?

    मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. खूप वेळा सरपंच या नात्याने मी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. माझ्या गावातील सर्व जाती-धर्माच्या समाजाला घेऊन बरेच वेळेस मोर्चामध्ये सहभाग घेऊन संघर्ष केला. पण सरकारला त्याबद्दल आतापर्यंत दया आली नाही. माझ्या मुलाचा कृषी खात्यात २०१२ ला अनुकंपा तत्वाखाली माझ्या पत्नीच्या वडिलांच्या जागी प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर कागदपत्रे कृषी संचालक कार्यालयात जमा करा, असे पत्र देण्यात आले. त्यानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तरीसुद्धा आजी आजोबांच्या जागेवर नोकरी देता येत नाही, अशी पत्राद्वारे माहिती दिली. ती जागा आमच्या हक्काची असून त्याची पूर्ण फाईल माझ्या गावी घरी कपाटात आहे.

    अधिकाऱ्यांच्या अपेक्षेपोटी आम्ही डावललो गेलो. आमच्या पदरी निराशा टाकण्यात आली. आज रोजी माझा मुलगा बेकार फिरत आहे. मी सरपंच या नात्याने २०२१ ला ६५ वर्षीय निराधार लोकांच्या पगारासाठी शिरूर अनंतपाळ तहसीलदारांकडे ५० ते ६० लोकांचे पेपर देऊन देखील त्या गरीब लोकांचे पगार शासन व प्रशासनाने केले नाहीत. हे शासन प्रशासन स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त आहे. जनतेला न्याय भेटत नाही. या निराशेपोटी मी माझी आहुती देत आहे, असं व्यंकट ढोपरे यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे.

    भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या हातावर काळी पट्टी बांधून का खेळत आहे; जाणून घ्या नेमकं कारण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed