विशाल बाळासाहेब आदमाने, सचिन किसन नावाडकर, सुमीत संतोष पायगुडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडितेच्या ७३ वर्षीय आईने फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा नवरा १० वर्षांपूर्वी वारला. त्यांना ४३ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. तिला ‘ब्रेन ट्युमर’चा आजार असून, तीन वेळा त्याची शस्त्रक्रिया झाली आहे. दोघीही अशिक्षित आहेत. नवरा वारल्यानंतर वारसा हक्काने ४७ गुंठे शेतजमीन त्यांना मिळाली आहे. त्यावर मायलेकी गुजराण करतात. अनेक वर्षांपासून गावातील एक महिला फिर्यादीची मैत्रीण आहे. फिर्यादीकडे तिचे येणे-जाणे सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी मैत्रीण फिर्यादीला हट्टाने सामान खरेदी करण्यासाठी पुण्याला घेऊन गेली.
मैत्रिणीचा मुलगा विशाल तीन मित्रांसह फिर्यादीच्या घरी गेला. त्यांनी मुलीला थंड पेय प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर चक्कर येऊन मुलगी बेशुद्ध पडली. त्याने मुलीवर अत्याचार केले. मित्रांनी त्याचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर ‘काही वाच्यता केली, तर व्हिडिओ सर्वांना दाखवून बदनामी करीन,’ अशी धमकी देऊन विशाल निघून गेला. फिर्यादी घरी आल्यावर सर्व प्रकार समजला. भीतीपोटी आणि घरात कोणी पुरुष माणूस नसल्यामुळे दोघी या प्रकाराविषयी कुठे बोलल्या नाहीत. त्यानंतर विशालने वेळोवेळी कोऱ्या कागदावर दोघींच्या सह्या घेतल्या. बँकेत नेऊन स्लीपवर, चेकवर सह्या घेऊन पैसे काढले. एकदा गाडीत बसवून एका ऑफिसमध्ये अंगठा घेऊन, कॅमेऱ्यासमोर फोटो घेतले. दोन दिवसांत घर खाली करण्याची धमकी विशालने दिल्यावर दोघी घाबरल्या.
नंतर पुण्यातील एका नातेवाइकाला घडलेला प्रकार सांगितल्यावर कागदपत्रे पाहिल्यावर जमीन व पैसे विशालने हडप केल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन खामगळ पुढील तपास करीत आहेत.