चाकणमध्ये एमडी या अमली द्रव्याची फॅक्टरी चालविणाऱ्या ललितसह टोळीला २०१९ मध्ये पुणे पोलिसांनी गजाआड केले. प्रत्यक्षात आजाराचे ढोंग करून ललित ससूनमध्ये ऐषोरामात राहिला. रुग्णालय हेच त्याने एमडी वितरणाचे केंद्र बनविले. लक्षावधीच्या रक्कमा रुग्णालय, कारागृह व पोलिस प्रशासनांना देत त्याने तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ हे उद्योग बिनबोभाट केले. धंद्याला बरकत आल्याचे दिसताच, त्याच्या भावाने नाशिकमध्ये कारखाना सुरू केला. मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे एका भल्या मोठ्या व्यवस्थेची साखळी समोर आली. रुग्णालयातून ललित फरार झाल्यावर कारागृह, पोलिस, रुग्णालयासह सर्वच यंत्रणांच्या बेफिकीरीचे धिंडवडे निघाले. खडबडून जागी झालेल्या पोलिसांनी राज्यात एमडी कारखाने शोधण्याचा ‘सिलसिला’ सुरू केला. त्यात महाराष्ट्रापुरताच हा विषय मर्यादित राहिला नाही. पोलिसांच्या तपासानुसार बड्या केमिकल कंपन्यांसह गुजरातपर्यंत कनेक्शन पोहोचले. नेत्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ड्रग्ज तस्करीचे राजकारण केले. या तस्करांना ‘धन’ पुरविणारे अद्याप समोर न आल्याने नशेमागील अर्थकारणाचे मूळ शोधण्याचे आव्हान मुंबई-नाशिक-पुणे पोलिसांसमोर कायम आहे.
ड्रग्ज प्रकरणाची पुढे दिलेली क्रोनोलॉजी अनेक मुद्यांकडे दिशानिर्देश करीत आहे, त्याकडे शासन किती गांभीर्याने पाहते यावर ही नशेची फॅक्टरी बंद होणार की नाही ते ठरेल.
३० सप्टेंबर : पुणे पोलिसांना ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन कोटींचे एक किलो ७१ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) सापडले. सुभाष जानकी मंडल व रौफ रहिम शेख यांना अटक झाली. वॉर्ड क्रमांक १६ मध्ये बंदी असलेल्या ललितच्या सांगण्यावरून एमडी आणल्याच्या जबाबानंतर ललितसह तिघांवर बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
२ ऑक्टोबर : ललित ससून रुग्णालयातून फरार झाला. नऊ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन झाले. रुग्णालय प्रशासनासह ‘प्रिझन वॉर्ड’मधील ‘मनमर्जी’ मुक्कामाचा भांडाफोड झाला.
५ ऑक्टोबर : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी नाशिकच्या शिंदे गाव एमआयडीसीत छापा टाकून एमडीचा कारखाना उद्ध्वस्त करीत १३३ किलो एमडी व साहित्य जप्त केले. जिशान इक्बाल शेख याला अटक केल्यावर ललितचा भाऊ भूषण पानपाटील व त्याचा मित्र अभिषेक बलकवडे यांचे ‘कनेक्शन’ उघड झाले.
५ ऑक्टोबर : नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची वडाळा गावात धाड. वसीम शेख, नसरिन ऊर्फ छोटी भाभी यांच्याकडून ५२ ग्रॅम एमडी जप्त. छोटी भाभीचा पती संशयित इम्तियाज ऊर्फ चिकन्या शेख याला अटक. पाठोपाठ साथीदार सलमान फलके (रा. ठाणे) यालाही अटक. सलमानचा पुरवठादार शब्बीरही ताब्यात. छोटी भाभी व तिचा पती मुंबईतून एमडी आणून वडाळा गावात विक्री करीत असल्याचे उघड.
७ ऑक्टोबर : शिंदे गावातील दुसऱ्या कारखान्यावर नाशिक पोलिसांचा छापा. पाच कोटी रुपयांचे एमडी व साहित्य जप्त. भूषण व अभिषेक हा कारखाना चालवित असल्याचे निष्पन्न.
१० ऑक्टोबर : भूषण व अभिषेक यांना पुणे पोलिसांकडून नेपाळ सीमेलगत अटक. ललित-भूषण-अभिषेक या त्रिकुटाचे छोटा राजन गँगसह इतर कुख्यात गुन्हेगारांशी संबंध असल्याचे तपासात उघड.
१२ ऑक्टोबर : अभिषेकच्या नाशिकमधील घरातून दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या विटा हस्तगत. याप्रकरणी नाशिकमधील अभिजित दुसाने हा सराफही चौकशीसाठी ताब्यात.
१३ ऑक्टोबर : शिंदे गावातील कारखान्यात सन २०२१ पासून आतापर्यंत सुमारे १८०० किलो एमडी उत्पादन झाले. भूषण हा महिन्याला २०० किलो एमडी बनवायचा. एक किलो एमडीची किंमत एक कोटी रुपये होती. एक किलो एमडी तयार करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च यायचा, हे तपासातून पुढे आले.
१५ ऑक्टोबर : साकीनाका पोलिसांकडून नाशिकला शिवाजी शिंदे, तर दिल्लीतून रोहितकुमार चौधरी यांना अटक. शिंदे हा कच्चा माल पुरवायचा, तर चौधरी जिशानसोबत एमडी तयार करायचा.
१८ ऑक्टोबर : साकीनाका पोलिसांनी ललित पानपाटील याला बेंगळुरू येथून ताब्यात घेत मुंबईतील अंधेरी न्यायालयात हजर केले.
१९ ऑक्टोबर : ललित फरार झाल्यावर त्याला मदत करणारी प्रेयसी ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे आणि मैत्रिण अर्चना किरण निकम यांना अटक. पलायनानंतर ललित नाशिकमध्ये मुक्कामी होता. तेव्हा अर्चना हिने भूषणकडून घेतलेले २५ लाख रुपये ललितला दिले. त्या पैश्यांवर त्याने पुढे पलायन केले. अर्चनाच्या घरातून पाच किलो चांदी जप्त. प्रज्ञा ही वकील असून, तिने ललितसह साथीदारांना न्यायप्रक्रियेत मदत केली. तिच्याच सांगण्यावरून भूषणने शिंदे गावात एमडीचा कारखाना सुरू केला. प्रज्ञाच्या सल्ल्यानुसारच ललित व भूषण कामकाज करायचे. पलायनानंतर ललित प्रज्ञाबरोबर पुण्यातीलच एका पंचतारांकित हॉटेलात मुक्कामी असल्याचेही उघड.
२० ऑक्टोबर : सोलापूर पोलिसांकडून मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ तीन किलो दहा ग्रॅम एमडी हस्तगत. सहा कोटी रुपयांच्या मुद्देमालासह दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडकेंना अटक. पाठोपाठ त्याच एमआयडीसीत बंद स्थितीत असलेल्या गोदामातून ३०० किलो कच्चा माल व हजार लिटर रसायन जप्त.
२० ऑक्टोबर : अहमदाबाद गुन्हे शाखा आणि डीआरआय पथकाचा छत्रपती संभाजीनगरातील पैठण एमआयडीसीतील आलिशान बंगल्यावर छापा. २५० कोटी रुपयांचे ४४ किलो अमली पदार्थासह तेवढ्याच रकमेचा कच्चा माल जप्त. जितेशकुमार हिनोरिया व संदीप कुमावत यांना अटक. पैकी एकाचा तेथेच खिडकीची काच गळ्यावरून फिरवून आत्महत्येचा प्रयत्न.
२२ ऑक्टोबर : शिंदे गावात साकीनाका पोलिसांनी एका संशयिताबरोबर केलेली ‘स्पॉट व्हिजिट’ संशयाच्या भोवऱ्यात. यंत्रणांतील असमन्वय यानिमित्ताने चव्हाट्यावर.
२३ ऑक्टोबर : मीरा भाईंदर, वसई, विरार पोलिसांकडून पालघर जिल्ह्यात एमडीचा कारखाना उद्ध्वस्त. ३७ कोटींचे एमडी जप्त. सात संशयितांना अटक. पिस्तूल आणि काडतुसेही हस्तगत.
२४ ऑक्टोबर : ललितचा वाहनचालक सचिन वाघ याने देवळानजीक एमडीच्या गोण्या गिरणा नदीत फेकल्या. साकीनाका पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवली पण, ड्रग्ज मिळाले नाहीत. देवळा तालुक्यात जंगलात पुरलेले १२.५ किलो ड्रग्ज मात्र पोलिसांकडून हस्तगत.
२७ ऑक्टोबर : नाशिक पोलिसांची सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड. दहा कोटी रुपयांच्या ‘एमडी’सह कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत. नाशिकमध्ये पुरवठा करण्यासाठी या कारखान्याचा वापर. संशयित सनी पगारे साथीदारामार्फत ही फॅक्टरी चालवायचा.
२७ ऑक्टोबर : ललित प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या चौकशी समितीचा सविस्तर अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे सादर.
फोटोंवरून राजकारण
मूळ नाशिकचा असलेल्या ललित पानपाटील याचा बोकड निर्यातीचा व्यवसाय होता. त्यादरम्यान, त्याने विविध राजकीय नेत्यांशी जवळीकही साधली. सन २०१५ पूर्वी आरपीआय आणि नंतर तो शिवसेनेत कार्यरत होता. शिवसेना पक्ष प्रवेशावेळी उद्धव ठाकरे शिवबंधन बांधतानाचा त्याचा फोटो गुन्ह्यानंतर व्हायरल झाला. त्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांसह इतरही नेते दिसत असल्याने त्यावरून राजकारण सुरू झाले. आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसेंसह संबंधीत शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना वारंवार स्पष्टीकरण द्यावे लागले. शिवसेना उबाठा व शिंदे गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत राजकारण तापवित ठेवले आहे. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाही काढण्यात आला. दसरा मेळाव्यातही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी ड्रग्ज प्रकरणावरून एकमेकांवर ताशेरे ओढले.
इतकेच नव्हे, तर ‘छोटी भाभी’ प्रकरणातील संशयित सलमान फलके याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांसोबतचे फोटो व्हायरल झाले.
‘अटक झाल्यावर वैद्यकीय तपासणीपूर्वी ललितने ‘मी पळालो नाही. मला पळवून लावलंय, मी सगळ्यांची नावे उघड करेन’, असा दावा केला. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लागलीच ‘आता अनेकांची तोंडे बंद होतील ’, असे विधान केल्याने खळबळ माजली. परंतु, आतापर्यंतच्या पोलिस तपासात तरी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव समोर आलेले नाही.
ललितची अपघातग्रस्त कार नाशिकच्या बडदेनगरच्या गॅरेजमध्ये सन २०१५ पासून पडून आहे. माजी महापौर विनायक पांडे यांचा तत्कालीन वाहनचालक अर्जुन परदेशी याने ही कार दुरुस्तीकरिता पाठविली होती. अर्जुनच्या चौकशीनंतर पांडे यांचीही चौकशी झाली. तर ‘छोटी भाभी’ प्रकरणात भाजप महिला आमदारांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दबावातंत्राचा वापर केल्याची चर्चा झाली. एकूणच ड्रग्जच्या प्रत्येक प्रकरणात शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. संशयितांच्या फोटोंवरून राजकीय नेत्यांच्या ‘कनेक्शन’चे दावे होत आहे. या गदारोळात ड्रग्ज माफियांना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे उकलणार की, ही ‘फाइल’ हिवाळी अधिवेशनानंतर बंद होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.