• Sat. Sep 21st, 2024
सोलापुरातील MIDCतील कंपनी ड्रग्जचा अड्डा, मुंबई पोलिसांसह अन्य दोन जिल्ह्यांच्या पोलिसांची कारवाई

सोलापूर : सोलापूर शहरालगत असलेली चिंचोळी एमआयडीसी ड्रग्ज अड्डा झाली आहे. मुंबई पोलिसांची कारवाई झाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी व आता नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज फॅक्टऱ्या उध्वस्त केल्या आहेत. ड्रग्जच्या कारवायांमुळे सोलापूर चिंचोळी एमआयडीसीचे नाव आंतरराष्ट्रीय ड्रग्ज बाजारात प्रसिद्ध झाले आहे. सोलापूर पुणे महामार्गावर असलेल्या चिंचोळी एमआयडीसी किंवा चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या कारखान्यामध्ये नाशिक पोलिसांनी कारवाई करत कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले. ही कारवाई (शुक्रवारी) नाशिक पोलिसांच्या तीन पथकांकडून करण्यात आली आहे.

बंद पडलेल्या केमिकल कंपन्या व कारखाने झाले ड्रग्ज फॅक्टऱ्या

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या एका कारखान्यातून नाशिक पोलिसांनी शुक्रवारी कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत मुंबई, सोलापूर ग्रामीण आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या या ड्रग्स कारवाईमुळे सोलापूर जिल्हा ड्रग्जच्या बाबतीत प्रकाशझोतात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधून बंद पडलेल्या कारखान्यांच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांतील सलग तिसऱ्या कारवाईमुळे सोलापूरमधील बंद पडलेल्या औद्योगिक कारखाने हे ड्रग्स बनविण्याचे कारखाने झाले आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत कमालाची गुप्तता, कारण…
मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई शहर गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या पथकाने पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली पहिली कारवाई झाली. सोलापुरातील बाळे परिसरात राहणाऱ्या राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी या दोघा सख्या भावांना मुंबई येथील खार परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून १६ कोटी रुपयांचे आठ किलो एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीमध्ये निघालेल्या माहितीवरून, मुंबई शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी एमआयडीसी मधील बंद पडलेल्या कारखान्यातून एमडी ड्रग्स साठा जप्त केला. कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स बनविण्याच्या कच्च्या मालाचा साठा जप्त केला होता. या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, या ड्रग्स कारखान्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या कैलास सिंहजी वनमाळी या मुख्य सूत्रधारास हैदराबाद येथून अटक केली आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

दुसरी कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली. एमडी ड्रग्स विकायला देवडी पाटीजवळ थांबलेल्या दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके (रा औंढी, ता. मोहोळ जि. सोलापूर) या चुलत भावांना अटक केली होते. घोडके बंधू कडून सहा कोटी रुपयांचे तीन किलो एमडी ड्रग्स जप्त केले. या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील एका बंद पडलेल्या कारखान्यातून ग्रामीण पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा कच्च्या मालाचा साठा जप्त केला. तसेच या गुन्ह्यामध्ये ड्रग्स तयार करण्यासाठी मदत करणारा कामगार छोटू उर्फ चंद्रभान कोल (वय २५, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यास प्रयागराज येथून अटक करण्यात आली. छोटू उर्फ चंद्रभान सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. घोडके व गवळी बंधूचा ड्रग्ज तस्करीत लागेबांधे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घोडके बंधूनी दाखवलेला कारखाना गवळी बंधूंचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गवळी बंधूंना तसेच मुंबई गुन्हे शाखेने पकडलेल्या कैलास वनसाळी यास देखील ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे सोलापूर पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

तिसरी कारवाई नाशिक पोलिसांची

तिसरी कारवाई नाशिक पोलिसांनी सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीत केली आहे. नाशिकमध्ये पकडलेल्या संशयीत आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील श्री. स्वामी समर्थ कंपनी या कारखान्याची तपासणी केली. त्या ठिकाणाहून कोट्यावधी रुपयांचे तीन किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी नाशिक पोलिसांनी केली. याबाबतची अधिकृत माहिती नाशिक पोलीस शनिवार देण्याची शक्यता आहे. या कारखान्यातून किती कच्चा माल मिळाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज रस्त्यावर उतरेल,रामदास तडस यांचा इशारा,मनोज जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed