• Sat. Sep 21st, 2024

ड्रगमाफियांकडून आदिवासी भाग लक्ष्य; फार्महाऊसच्या नावाखाली अमली पदार्थांचा गोरखधंदा

ड्रगमाफियांकडून आदिवासी भाग लक्ष्य; फार्महाऊसच्या नावाखाली अमली पदार्थांचा गोरखधंदा

जव्हार : पालघर जिल्ह्याचा आदिवासी ग्रामीण भाग आजपर्यंत कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटनांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र मोखाडालगतच्या कावळपाडा येथील फार्महाऊसवर ड्रग तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे चार दिवसांपूर्वी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ड्रगमाफियांनी आपली पाळेमुळे शहरांसह आदिवासी ग्रामीण भागांतही रुजवल्याचे यावरून समोर आले.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि डहाणू या तालुक्यांना निर्सगाने भरभरून सौंदर्य दिले आहे. त्यामुळे शहरातील श्रीमंतांनी या भागांत जमिनी खरेदी करून गावापासून काही अंतरावर निर्जनस्थळी फार्महाऊस, रिसॉर्ट बांधले आहेत. बहुतांश ठिकाणी या रिसॉर्ट आणि फार्महाऊसना ग्रामपंचायतींनीच नळपाणी तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यातून ग्रामपंचायतींनाही उत्पन्न मिळत आहे. मात्र, या फार्महाऊसचा वापर कशासाठी केला जातो, तेथे विकेंडला कुटुंबे येतात का, काही गैरप्रकार किंवा संशयास्पद हालचाली सुरू आहे का, याची कुठलीही माहिती ग्रामपंचायत, पोलिस अथवा महसूल प्रशासन घेत नाही. येथे कोण, कधी येते, नियमित येणाऱ्या व्यक्तींशिवाय नवख्या व्यक्तींचा वावर येथे आहे का, याकडे कुणी सजग नागरिकही लक्ष देत नाहीत. त्यामुळे जंगलात उभारलेल्या फार्महाऊसमध्ये राजरोस बेकायदा व्यवसाय सुरू झाल्याचे ड्रग कारखानाप्रकरणाने उघडकीस आले आहे.

मोखाडा नगरपंचायत क्षेत्रातील कावळपाडा येथून अवघ्या काही मीटर अंतरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. त्याच्या मागील बाजूस समीर पिंजार या ड्रग प्रकरणातील आरोपीचे फार्महाऊस आहे. त्यातील एका खोलीत ड्रग बनवण्याचे साहित्य आणि रसायने ठेवली जात होती. काही वर्षांपासून या फार्महाऊसच्या आडून समीर ड्रग निर्मिती करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकाराची माहिती स्थनिक पोलिस, नगरपंचायत प्रशासन अथवा रहिवाशांनी नव्हती.
नाशिकसाठी सोलापुरात फॅक्टरी; सनी पगारेचा साथीदार ताब्यात, दहा कोटींचे एमडी जप्त
नाशिकमधील ड्रगमाफिया ललित पाटील याचा कारखानाही शहरापासून दूर शिंदे गावात आढळून आला आहे. संभाजीनगर, सोलापूर आणि मुंबई या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांच्या कारवाईत पकडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ड्रग कारखाने उभारून आणि त्यांचे वितरण शहरी भागात करून तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे पोलिस कारवाईत स्पष्ट झाले आहे. मोखाड्यातील प्रकरणानंतर ग्रामीण आदिवासी भागातील रिसॉर्ट आणि फार्महाऊस पोलिसांच्या रडावर आले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषणामुळे चर्चेत आलेला भाग आता ड्रग कारखानाप्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिक प्रशासन आणि रहिवाशांनी सजग राहिल्यास, ग्रामीण भागावरील ड्रगचा कलंक पुसला जाईल, असे मत व्यक्त होत आहे.

रिसॉर्ट तसेच फार्महाऊसची माहिती घेऊन तेथे अचानक पाहणी करणार आहोत. काही आक्षेपार्ह हालचाली, व्यवसाय अथवा गैरप्रकार आढळून आल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाईल.- धनंजय जगदाळे,पोलिस निरीक्षक, मोखाडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed