यावेळी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल, याबाबत माहिती दिली. मात्र, यावेळी मनोज जरांगे पाटील यांना बोलताना थोडीशी धाप लागत होती. ते नेहमीप्रमाणे सलग बोलू शकत नव्हते. एक वाक्य पूर्ण करतानाही ते थांबून थांबून बोलत होते. याशिवाय, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना थकवा आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. बोलताना त्यांच्या डोळ्यांवर ग्लानी येत होती. मनोज जरांगे पाटील यांची ही अवस्था पाहून मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मनोज जरांगे यांनी थकलेल्या अवस्थेतही मराठा आंदोलकांना सूचना दिल्या, तसेच राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मी मराठा समाजातील बांधवांना सांगतो की, कोणीही आत्महत्या करु नका आणि कोणाला करुनही देऊ नका. मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की, हा प्रकार गांभीर्याने घ्यावा. तुमच्या नातलगांना असं केलं तरी तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. लोकांची लेकरं मरत असताना मजा बघू नका. सरकारने हा प्रकार इतक्या सहजपणे घेऊ नये. हे तुम्हाला जड जाईल. मी राज्य सरकाराला शेवटचं सांगतो, मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मनोज जरांगे यांनी २९ ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांना आमरण उपोषणासाठी बसण्याचेही आवाहन केले. ज्यांना शक्य आहे त्यांनी वयाचा, प्रकृतीचा अंदाज घेऊन फक्त पाण्यावर आमरण उपोषण सुरु करावे. गावकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे इथे एकजुटीने बसा. आमरण उपोषणात गावं सहभागी झाल्यास राज्य सरकारवर दबाव निर्माण होतो का पाहू. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावे, यासाठी आपण हे आमरण उपोषण सुरु करत आहोत. आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला दारात येऊन द्यायचे नाही. आपणही कोणाच्या दारात जायचे नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.