याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गणेश काकासाहेब कुबेर (वय २८, वर्ष राहणार आपतगाव चित्तेपिंपळगाव) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गणेशाच्या घरी दुपारच्या सुमारास कोणी नसताना त्याने स्वतःच्या हस्ताक्षरमध्ये पाटीवर लिहिले की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये, असा मजकूर लिहित त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर गाजत असताना विविध तरुण आत्महत्या करत आहेत. यातच गणेश कुबेर या तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना कळतच मराठा बांधवांनी एकच गर्दी केली होती. यावेळी गुणरत्न सदावर्ते याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी नातेवाईक व गावकऱ्यांनी केली.
पंतप्रधान मोदी शिर्डीत येऊन गेले पण मराठा आरक्षणाबद्दल शब्दही नाही
मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि मराठा आंदोलकांनी बहिष्कार टाकण्याचा केलेला प्रयत्न या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभेकडे लक्ष लागले होते. मात्र, याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या सभेमध्ये मोदी यांनी केंद्र आणि राज्याची विकासकामे मांडली. मात्र, मोदी किंवा अन्य वक्त्यांनी मराठा आरक्षणाचा विषयही सभेत काढला नाही. या मुद्द्यावरून आंदोलनाचा इशारा देणारे संभाजी बिग्रेड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.
गावागावांत बेमुदत उपोषण
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास खुलताबाद तालुक्यातील विविध गावांमध्ये मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला असून, गावागावांत बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. खुलताबाद तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी काळात मराठा आरक्षण आणखीच तापण्याची शक्यता आहे. खुलताबाद तालुक्यातील काटशिवरी फाटा येथे बुधवारपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी उपोषणाला बुधवारपासून सुरुवात झाली. गुरुवारी भडजी येथील नागरिकांनी सहभाग घेऊन उपोषणास सुरुवात केली. तालुक्यातील सुल्तानपूर, कानडगाव, भांडेगाव, खांडी पिंपळगाव यासह अनेक गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे बुधवारपासून साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी मोठ्या संख्येने सर्व समाजांचे नागरिक उपस्थित होत आहेत. ‘एकच लक्ष मराठा आरक्षण’ अशी घोषणा देण्यात येत आहे. नेत्यांचे दौरे, कार्यक्रम बंद मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांचे दौरे, कार्यक्रम बंद झाले आहेत. अनेक गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन गावांतीलच ग्रामस्थांच्या हस्ते केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.