• Sat. Sep 21st, 2024

डेक्कन क्वीनमध्ये जंतूनाशक फवारणी, उंदराच्या वावराबाबत ‘मटा’च्या बातमीची गंभीर दखल

डेक्कन क्वीनमध्ये जंतूनाशक फवारणी, उंदराच्या वावराबाबत ‘मटा’च्या बातमीची गंभीर दखल

मुंबई : ‘डेक्कन क्वीनमध्ये मूषकराजाचा वावर’ ही बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध होताच मध्य रेल्वेने याची गंभीर दखल घेतली. डेक्कन क्वीन मुंबईत दाखल होताच मुंबई विभागाने गाडीची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. सर्व डब्यांमध्ये जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली आहे. गाडीमध्ये पेस्ट कंट्रोल करण्याची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराला दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. शिवाय गाडीत वावरत असलेल्या दोन उंदरांना पकडण्यात आले, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्यासाठी रवाना झालेल्या डेक्कन क्वीनमधील पासधारकांच्या डब्यात छतावर उंदरांचा वावर असल्याची बाब बुधवारी उघडकीस आली. समाजमाध्यमातून दोन उंदरांचे फोटो, व्हिडीओ समोर आले होते. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले. यानंतर गाडीतील उंदरांचा बंदोबस्त करण्यासह डेक्कन क्वीन निर्जंतूक करण्याच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागाला दिल्या.

डेक्कन क्वीन सीएसएमटीमध्ये दाखत होताच रेल्वे प्रशासनाकडून संपूर्ण गाडीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्वप्रथम गाडीच्या छतावर असलेल्या उंदरांना पकडण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गाडीची स्वच्छता करून जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. प्रवाशांना स्वच्छ आणि जंतुमुक्त वातावरणात प्रवास करता यावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
डोक्यावर उंदीर अन् पायाखाली झुरळं; डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची अजब सवारी, प्रवाशांचा संताप
डेक्कन क्वीनमध्ये पेस्ट कंट्रोल करण्याचे काम खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदारांकडून रेल्वेगाडीत नियमित औषध फवारणी करण्यात येते. उंदरांना पकडण्यासाठी प्रत्येक डब्यात आठ रॅटपॅड लावण्यात आले आहेत. मात्र येथे उंदरांचा वावर असल्याने कर्तव्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत कंत्राटदाराला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. वाडीबंदर यार्ड परिसरात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस देखभालीसाठी उभी करण्यात येते. यार्डमधील उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत, असे अन्य रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed