कल्याण-कसारा-कर्जत दरम्यानच्या स्थानकांमधील अंतर अधिक असून या भागात लोकल गाड्यांची संख्याही अपुरी आहे. कसारा, कर्जत आणि खोपोली स्थानकांतून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना अत्यंत मोजक्या गाड्या असल्या, तरी त्या गाड्याही दररोज विलंबाने धावतात. कल्याण स्थानकावर येईपर्यंत कोणतीही गाडी वेळ पाळते असे नाही, परंतु त्यानंतर पुढील प्रवासात वेळ पाळण्याचा प्रयत्न केला जातो. कल्याणला येईपर्यंतच वेळापत्रक बिघडल्यामुळे पुढील वेळापत्रक बिघडलेले राहते. त्यामुळे मुंबईतील एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकल गाडीचे नियोजन करून प्रवास सुरू केला, तर ठरलेल्या वेळेच्या एक ते दीड तास उशिराने पोहोचण्याची शक्यता निर्माण होते. विमानतळावर विमान पकडण्यासाठी जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा फटका बसल्याचे सातत्याने समोर येत आहे. परिणामी अनेकजण आधीची लोकल पकडण्याचा प्रयत्न करतात. तरी गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने त्याचाही फटका बसतो. लोकल विलंबामुळे नोकरी, व्यवसायवरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे.
जलद गाड्यांचे वेळपत्रक बिघडले…
ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकांची निर्मिती झाल्यानंतर शंभराहून अधिक लोकल फेऱ्या वाढवण्याचा दावा केला जात होता. परंतु या मार्गिकांच्या निर्मितीनंतर रेल्वेची क्षमता वाढवण्याऐवजी रेल्वेच्या आधीच्या वक्तशीरपणामध्ये अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी जलद गाड्या पारसिक बोगद्यातून पुढे जात होत्या. त्यामुळे या गाड्यांचा वेळ पाच ते दहा मिनिटांनी वाचत होता. परंतु आता जलद गाड्याही कळवा, मुंब्रा दिवा स्थानकांतून जात असल्यामुळे त्यांचे वेळापत्रक दिवसेंदिवस ढासळू लागले आहे.
अनेक गाड्या यात्री अॅपवरूनही दूर
मध्य रेल्वेकडून लोकलगाड्यांचे रिअल टाइम लोकेशन दाखवण्याच्या दृष्टीने यात्री या अॅपची सुरुवात केली असून त्यावर लोकलगाड्यांची माहिती दिली जाते. परंतु ठाणे स्थानकातून कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथकडे जाणाऱ्या काही गाड्यांचे लोकेशन अद्याप दिसत नाही. दादर स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांचेही लोकेशन दिसत नसल्यामुळे या गाड्यांची माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे या गाड्यांची माहिती द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून केली जात आहे.
ठाणे स्थानकातून शटल वाढवा
ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या शटल गाड्यांची संख्या अत्यंत मर्यादित असून केवळ कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान या शटल धावतात. त्यामुळे सायंकाळी आसनगाव, टिटवाळा, कसारा आणि खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या स्थानकांतून शटल वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.