• Sat. Sep 21st, 2024

मुंबईजवळ पुन्हा संतापजनक घटना! मराठी कुटुंबाला घरखरेदीस नकार, अर्धा व्यवहार पूर्ण केला, पण…

मुंबईजवळ पुन्हा संतापजनक घटना! मराठी कुटुंबाला घरखरेदीस नकार, अर्धा व्यवहार पूर्ण केला, पण…

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मराठी असल्याचे सांगत घर देण्यास नकार देण्यात आल्याची घटना मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता भाईंदरमध्येही एका कुटुंबाला ते मराठी असल्याने घर खरेदीस नकार देण्यात आला आहे. या कुटुंबाने खरेदीसाठी निम्मा व्यवहारही पूर्ण केला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत गणेश रानखांबे हे कुटुंबासह भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. ते काही महिन्यांपासून स्वतःच्या मालकीच्या घराच्या शोधत होते. येथील जैन मंदिराजवळ ‘जय श्रीपाल’ इमारतीत एका सदनिकेची विक्री करायची असल्याने त्यांनी घर मालकाशी संपर्क साधून २५ लाख रुपयांत व्यवहार निश्चित केला. मार्चमध्ये यातील ७ लाख रुपये त्यांनी घर मालकास दिले. त्याची नोंदणीही झाली. रानखांबे यांना घराचे उर्वरीत पैसे देण्यासाठी कर्ज काढायचे असल्याने सोसायटीच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. परंतु ते देण्यास नकार दिला जात आहे. तर घर मालकानेही व्यवहार रद्द करण्याची मागणी केल्याचे रानखांबे यांचे म्हणणे आहे.

आरक्षणासाठी जीव देतोय, माझं बलिदान वाया जाऊन देऊ नका! नांदेडमध्ये मराठा तरुणानं आयुष्य संपवलं

‘या इमारतीतील काही सदनिकांची खरेदी करणाऱ्यांना यापूर्वी सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पण इमारतीतील सर्व जण अन्य भाषिक असल्याने मला नकार दिला जात आहे’, असे रानखांबे म्हणाले.

दरम्यान, या संदर्भात रानखांबे यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडेही त्यांनी पत्राद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. मनसेचे हरेश सुतार यांनी याची दखल घेत, तीन दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यास व व्यवहार पूर्ण न केल्यास कठोर भूमिका घेऊ, असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed