मुंबईत गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्या मुंबईत वाहनांची संख्या ४३ लाख झाली आहे. २०११-१२मध्ये हीच आकडेवारी २० लाख २८ हजार ५०० एवढी होती. गेल्या दहा वर्षांत मुंबईतील वाहनसंख्या दुपटीने वाढली. परिणामी प्रदूषणासोबत वाहतूककोंडी, पार्किंग यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही पार्किंगवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांसोबत रस्त्यांवरील पार्किंगच्या (ऑन स्ट्रीट पार्किंग) सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेचे मुंबईतील रस्त्यांवर असलेली पार्किंगची संख्या मेट्रो, विविध रस्त्यांची कामे, वाहतुकीला होणारा अडथळा आदी कारणांमुळे कमी होऊ लागली. सध्या मुंबईतील २४पैकी ११ वॉर्डांमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते. यापैकीही सात वॉर्डांमध्येच ७ हजार ७९१ वाहने रस्त्यावर उभी केली जातात. तर चार वॉर्डांमध्ये रस्त्यांवरील पार्किंग विविध कारणांमुळे बंद झाली. २४पैकी उर्वरित १३ वॉर्डांमध्ये पालिकेकडून वाहनचालकांना रस्त्यांवर मोफत पार्किंग सेवा आहे.
पार्किंगची गरज पाहता पालिकेने पुन्हा रस्त्यांच्या कडेला पार्किंग व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या सर्व २४ वॉर्डांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. काही वॉर्डांकडून उपलब्ध माहितीनंतर प्रथम ग्रँट रोड, गिरगाव, मुंबई सेंट्रल, मलबार हिल या डी वॉर्ड, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ जी दक्षिण, अंधेरी पश्चिम या के पश्चिम आणि भांडुप पश्चिम या एस वॉर्डमध्ये रस्त्यांवरील पार्किंग सुविधेत वाढ करण्यात येणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या चारही ठिकाणी २१ हजार ९६१ वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य वॉर्डांत अंमलबजावणी केली जाणार आहे. डी वॉर्डमध्ये १२७ ठिकाणी, जी दक्षिणमध्ये ८६, के पश्चिममध्ये २२० आणि एस वॉर्डमध्ये १०८ ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
पार्किंग क्षमता
वॉर्ड सध्या पार्क होणारी वाहने क्षमता वाढल्यावरची वाहनसंख्या
डी १०८ २,७२७
जी दक्षिण २३० ४,२८२
के पश्चिम २५२ १०,८४८
एस — ४,१०४