पश्चिम रेल्वेच्या धीम्या व जलद लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेसह दुपारच्या सत्रातील लोकल फेऱ्या विलंबाने धावतात. सामान्य लोकलसह एसी लोकलचीही हीच स्थिती आहे. लोकलमध्ये उद्घोषणा यंत्रणा आहे, पण त्याचा वापर होत नाही. फलाटांवरील इंडिकेटरवर लोकलची अपेक्षित वेळ चुकीची दाखवणे, लोकलचे नियोजित फलाट अचानक बदलणे, यांमुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धावत अन्य फलाटांवर पोहोचणे शक्य होत नसल्याने अन्य लोकल येईपर्यंत त्याच फलाटावर वाट पाहावी लागते, असे प्रवासी सोनिया मोरे यांनी सांगितले.
अंधेरी स्थानकातील इंडिकेटरवरील लोकलची अपेक्षित वेळ योग्य दाखवली जाते. मात्र अन्य स्थानकांवर लोकल पुढे गेल्यानंतर अनेकदा इंडिकेटर झळकवले जात असल्याने प्रवाशांच्या गोंधळात वाढ होते. लोकलमध्ये गार्ड आणि मोटरमन कार्यरत असतात. लोकल चालवण्याचे काम मोटरमनचे असते. यावेळी गार्डने लोकलमध्ये घोषणा करणे का शक्य नाही, असा संतप्त प्रश्न प्रवासी सदानंद जाधव यांनी उपस्थित केला आहे. मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेवरील रेल्वे फेऱ्यांची वर्दळ कमी आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली येथे थांबतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला अनेक मेल-एक्स्प्रेस जातात. मात्र चर्चगेटपर्यंत लोकल वगळता अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या येत नाहीत. तरीही पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमधून असंतोष व्यक्त होत आहे.
दसऱ्यानंतर त्रासात भर पडणार
पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेला मुख्य रुळांशी जोडण्याचे काम सुरू आहे. खार ते गोरेगावदरम्यान जोडणी सुरू आहे. या कामांमुळे शनिवारी १५ लोकल विलंबाने धावत होत्या. ६ लोकल पूर्ण रद्द आणि ६ लोकल अंशतः रद्द करण्यात आल्या. दसऱ्यानंतर जोडणीचे मुख्य काम सुरू होणार असल्याने रोज किमान १५० ते कमाल ४०० लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. याच वेळेत रोज ३०० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. यामुळे दसऱ्यानंतर पश्चिम रेल्वेवरील लोकल प्रवाशांना आठवडाभर मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
तुमच्या तक्रारी कळवा
मुंबईत लोकल गाड्यांनी प्रवास करताना तुम्हालाही विविध समस्यांशी सामना करावा लागत असेल. त्या बाबतच्या तक्रारी आम्हाला [email protected] वर ई-मेल कराव्यात. तक्रारी मोजक्या शब्दांत आणि नेमक्या स्वरूपात पाठवाव्यात. तुमचा आवाज आम्ही रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवू.
लोकल मनस्तापाचा तिसरा दिवस
मध्य रेल्वेच्या रखडगाडीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले असतानाच, सलग तिसऱ्या दिवशी मुख्य मार्गावरील खोळंब्यामुळे नोकरदार वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आधी भांडुप ते नाहूर आणि त्यानंतर चिंचपोकळी ते करीरोडदरम्यान लोकल खोळंबल्या होत्या. भांडुप ते नाहूरदरम्यान लोकल जागीच उभी राहिली. त्यात प्रवाशांना उद्घोषणेतून कोणतीही माहिती मिळाली नाही. २० मिनिटांनंतरही लोकल सुरू झाली नसल्याने प्रवाशांनी रुळांवर उतरून चालत स्थानक गाठले.
लोकल विलंबाने धावत असल्याबाबत रेल्वे स्थानकावर उद्घोषणा करण्यात येत असली तरी लोकलमध्ये अद्याप उद्घोषणा करण्यात येत नाही. रेल्वे प्रवाशांच्या रोजच्या प्रवासाचे गणित हे कामाच्या वेळेवर काटेकोर अवलंबून असते. यामुळे दररोज होणारे विलंब हे त्यांच्यासाठी मनस्ताप देणारे ठरत आहे. प्रवाशांच्या व्यथा मांडण्यासाठी ‘पुन्हा रेल्वेचे रडगाणे’ ही मोहीम ‘महाराष्ट्र टाइम्स’कडून सुरू करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भांडुप ते नाहूरदरम्यान लोकल थांबली. सुरुवातीला काही मिनिटात लोकल पुन्हा सुरू होईल, अशी आशा प्रवाशांना होती. मात्र वेळ वाढू लागताच आशा मावळू लागली. भांडुप स्थानकाच्या अलीकडे दुपारी एक वाजल्यापासून लोकल थांबली. लोकलमध्ये उद्घोषणा यंत्रणा असूनही त्यातून प्रवाशांना कोणताही माहिती मिळाली नाही. अखेर दीड वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी रुळांवर उतरून चालत स्थापक गाठण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ नागरिकांसह काही प्रवाशांना रुळांवर उड्या मारणे शक्य झाले नाही. यामुळे गाडी सुरू होईपर्यंत प्रवासी गाडीतच बसून राहिले. पावणे दोनच्या सुमारास लोकल सुरू झाली, असे प्रवासी सुचित्रा माने यांनी सांगितले.
ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंतर पार करण्यासाठी एक तास पुरेसा असतो. मात्र शनिवारी दुपारी दीड तास लागत असल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली होती. रेल्वे स्थानकावर लोकल विलंबाने येत असल्याची उद्घोषणा करण्यात येत असली तरी विलंबाचे कारण देण्यात येत नव्हते. स्थानकादरम्यान लोकल थांबल्यास लोकलमधील उद्घोषणा यंत्रणेतून माहिती प्रवाशांना मिळावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांची आहे.
पुन्हा ‘डिस्ट्रेस ब्लॉक’
भांडूप-नाहूरपाठोपाठ चिंचपोकळी-करीरोडदरम्यानही लोकल गाड्या थांबतच पुढे सरकत होत्या. दुपारच्या वेळेत होत असलेल्या लोकल खोळंब्याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता, पुन्हा ‘डिस्ट्रेस ब्लॉक’मुळे हा खोळंबा झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.