नगरसेवकांची बैठक
पुण्याचे गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा बैठक घेऊन, त्यामध्ये भाजपच्या नगरेसेवकांनी निमंत्रित केले होते. त्याधर्तीवर आता विद्यमान पालकमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे. महापालिकेच्या गत निवडणुकांमध्ये; तसेच गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजप आणि ‘राष्ट्रवादी’तील संघर्ष हा पुणे शहराने पाहिला आहे. राज्यातील सत्ताकारणातील समीकरणे बदलल्याने पुण्यात मात्र भाजपच्या माजी नगरसेवकांची अडचण झाली आहे.
कामे मार्गी लागणार?
पुण्याचे पालकमंत्रिपद असताना चंद्रकांत पाटलांकडून भाजपच्या माजी नगरसेवकांचे प्रश्न सोडविण्यास वेळ देण्यात येत होता. आता पालकमंत्री पवार असल्याने ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकांना त्याचा फायदा होत आहे. आगामी निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’बरोबरच संघर्ष करायचा असेल, तर वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या माजी नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. याशिवाय गेले दीड वर्ष पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे असल्याने या काळात भाजपच्याच माजी नगरसेवकांची कामे झाली आहेत. सध्या पालकमंत्रिपद ‘राष्ट्रवादी’कडे आल्याने आमच्या प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचा दावा ‘राष्ट्रवादी’च्या माजी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.
सहपालकमंत्री आणि भाजप
भाजपच्या माजी नगरसेवकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठका घेण्यासाठी विनंती केली आहे. येत्या आठवड्यात पाटील यांच्याकडून बैठकांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. तसेही पाटील यांनी त्यांच्यासह दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पुण्याचे सहपालकमंत्रिपद असल्याचा दावा केला आहे.