अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये नगर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पक्षाचे उमेदवार म्हणून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर अधिक चर्चा झाली. याशिवाय इतरही काही नावे चर्चेत आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पारनेरचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यावेळी उपस्थित होते. त्यांनी बैठकीतच आमदार लंके पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तरटे यांना मध्येच थांबवत हे स्वत: लंके यांना जाहीर करू द्या, असे सूचविले.
बैठकीत उमेदवाराच्या नावावर एकमत झाले नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणू असा निर्धार यावेळी करण्यात आला. राष्ट्रवादी फुटीच्या आधी या जागेसाठी आमदार लंके यांचे नाव पुढे आले होते. मात्र, आता ते अजितदादा गटात गेले आहेत. या मतदारसंघात भाजपचे डॉ. विखे पाटील विद्यामान आमदार असल्याने अजितदादा गटाकडून लंके यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. शिवाय एकत्र आले असले तरी विखे पाटील आणि लंके यांच्यात पूर्वीचे वैर कायम आहे. त्यामुळे विखे पाटील यांचा पराभव करण्यासाठीच लंके अशी दुहेरी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.
आपण पवारांना सोडलेले नाही, हे लंके यांनी यापूर्वीही दाखवून दिले आहे. अजितदादा गटाच्या कार्यक्रमात आता पवार यांचे छायात्रिच वापरणे बंद करून स्व. यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र वापरण्यास सुरवात करण्यात आली आहे. मात्र, लंके यांच्या मतदारसंघात सुपे येथे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला. त्यावेळी कार्यक्रमाच्या बॅनरवर शरद पवार आणि खासदार सुळे यांची छायाचित्र लावल्याचे दिसून आले. पूर्वी एकदा पवार नगरला आले असते लंके यांच्या घरी गेले होते. तर आता अजितदादाही लंके यांच्या घरी गेले होते. दोघांचेही लंके यांनी तेवढ्याच आपुलकीने स्वागत केले. त्यामुळे लंके यांची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News