• Mon. Nov 25th, 2024

    PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन

    PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन

    अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डीला येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मोदींच्या या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबरला मोदी शिर्डीत विविध कार्यक्रमांसाठी येणार आहेत. नियोजनासाठी सध्या सरकारी आणि पक्षाच्याही बैठका सुरू आहेत. गर्दी जमवण्यास मदत व्हावी, यासाठी या दिवशी शाळांना सुट्टी देण्याचीही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ३० ते ३५ हजार लाभार्थी आणि लाखांची गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे.

    साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा २६ ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे ३० ते ३५ हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.

    ठाणेकरांना गुड न्यूज! बहुसंख्य परवडणारी घरे मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

    लोकांच्या येण्या-जाण्यासाठी गावनिहाय वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जास्तीत जास्त भर एसटीच्या बस घेण्यावर देण्यात आला आहे. मात्र, बस कमी पडतात, तसेच मागील वेळी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम शिर्डीत झाला, तेव्हा एसटी गाड्या कमी पडल्याने लोकांचे हाल झाल्याचा अनुभव आला होता. त्यामुळे २६ ऑक्टोबरला शाळांना सुट्टी द्यावी, त्याऐवजी एखाद्या रविवारी शाळा भरवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

    शाळा बंद ठेवल्यास शाळांसाठी वापरण्यात येणाऱ्या बस कार्यक्रमासाठी वापरता येतात. तसेच शाळेत जाण्यासाठी एसटी बस मिळाली नाही, अशी तक्रारीही येणार नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात शाळांना सुट्टी द्यावी, असा प्रस्ताव पालकमंत्री विखे पाटील यांनीच पक्षाच्या बैठकीत ठेवला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही ही मागणी उचलून धरली. वाहतुकीची जबाबदारी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे.

    याशिवाय पालकमंत्री विखे पाटील यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटांच्या कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेत कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून सूचना केल्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर आदी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *