‘मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथे खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीन खरेदी करण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्गासाठी बेकायदेशीरपणे एक लाख 18 हजार ब्रास गौणखनिज उत्खनन करण्यात येऊन तब्बल ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आला आणि शासनाची फसवणूक झाली,’ अशी तक्रार मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महसूलमंत्र्यांकडे केली होती. याच विषयावर २६ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी मांडत, एसआयटी चौकशीची मागणी पाटील यांनी केली होती. या तक्रारीनुसार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभेच्या सभागृहात दिले होते. महसूल मंत्र्याच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटी समितीने जानेवारी महिन्यातील तक्रारीनुसार गौण खनिजाचे उत्खन्नन झालेल्या भूखंडाची पाहणी करत मोजमाप केले होते आणि त्यानुसार चौकशी करुन अहवाल हा शासनाला सादर केला होता.
खडसे कुटुंबातील चार जणांचा समावेश, खासदार खडसेही चौकशीच्या फेऱ्यात
एसआयटीने शासनाकडे केलेल्या सादर केलेल्या अहवालानुसार, बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात कारवाईला सुरुवात झाली असून कारवाईचा पहिला टप्पा म्हणून ज्या जमिनी तसेच भूखंडावरुन गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आले, त्या जमीनमालकांचा दंडाच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती आहे. मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजावल्या आहेत. मुक्ताईनगर तहसीलदार यांनी बजावलेल्या नोटिसीनुसार , मुक्ताईनगर तालुक्यातील सातोडमध्ये एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक २२५ मधील १/२, २/१, २/२, २/३ या पोटहिस्स्यातून अवैध उपसा करण्यात आला आहे. त्यानुसार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह सातोड (मुक्ताईनगर) येथील सहा जमीनमालकांना ६ ऑक्टोबर रोजी एकूण १३७ कोटीहून अधिक दंडाच्या रकमेच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे. यापोटी पाच पटीने दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर कारवाईचे दिले होते संकेत
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याच्या घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल जळगावात पत्रकारांशी बोलतांना दिले होते. कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन केल्याचे पुरावे देखील आहेत, माझा आरोप खरा असल्यामुळे चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करण्यात आली होती. आता एसआयटीची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. लवकरच कारवाईबाबतचे पत्र आपल्या हातात पडेल अशी सुद्धा माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. त्यानंतर आज खडसे कुटुंबियांना दंडात्मक नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.