• Mon. Nov 25th, 2024

    रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

    रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका

    गजानन धांडे, बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले तरीही लागवड क्षेत्रात होणारे बदल पाहता रब्बीच्या उत्पादन जवळपास २० टक्क्यांपर्यंत तूट येईल, असा धोका कृषीतज्ज्ञांनी वर्तविला आहे.

    नैसर्गिकरित्या दोन भागांमध्ये विखुरलेल्या बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली महापुराने पाच तालुक्यांना तडाखा दिला. घाटावर नदी नाल्यांना अपवाद वगळता पुराची प्रतीक्षा कायम राहिली. त्यामुळे परिणामतः जलसाठा प्रकल्पांची स्थिती देखील बिकट आहे. गतवर्षी मोठ्या तीन प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा हा २०९ दलघमीच्या सुमारास होता. तर आज हा साठा केवळ ७९ दलघमीच्या आसपास आहे. तसेच सात मध्यम प्रकल्पांमध्येही गतवर्षी १३६ दलघमी साठा होता. यावर्षी हा साठा ९२ दलघमीच्या जवळपास आहे. लघु प्रकल्पांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. रब्बी हंगामासाठी जमिनीमध्ये जी ओल लागते त्याची देखील मोठी अडचण पावसाअभावी घाटावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांवर शेतकरी मशागती आटोपत्या घेत पेरते होणार आहेत. कृषी विभागाने ३ लाख ३६ हजार ४५३ हेक्टरवर रब्बी पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सुरू असल्याने कृषी विभागाने ज्वारी आणि मक्याचे गतवर्षीपेक्षा लागवड क्षेत्र वाढवण्याचे ठरवले आहे. गतवर्षी ज्वारी ही जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर होती. यंदा वीस हजार हेक्टर क्षेत्रावर जाणार आहे. तर मक्याचे क्षेत्र देखील १९ हजार हेक्टर होते, यंदा ते तीस हजार हेक्टर करण्यात येणार आहे. अर्थात हे नियोजन करण्यात आलेले असले तरी जलसाठा स्त्रोतांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे लागवड क्षेत्राच्या तुलनेत देखील घट होणे अपेक्षित आहे. गतवर्षी तीन लाख ४० हजार हेक्टरवर लागवड झालेली होती. त्यात यंदा नियोजनाच्या आकडेवारीनुसारच घट अपेक्षित आहे. साहजिकच रब्बीच्या पीक उत्पादनातही सुमारे २० टक्के घट होईल, असे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत.

    तुटीचा धोका वाढणार

    नुकत्याच काढण्यात आलेल्या पीक आणेवारीत दुष्काळाला नजरेआड करण्यात आलेले असले तरीही सुधारित मध्ये चित्र स्पष्ट होईल. जिल्हा मुख्यालयाच्या बुलढाणा तालुका आणि घाटावरील लोणारमधील चित्र फारसे समाधानकारक नाही. पावसाची सरासरी यंदा कमी असल्याने मोठ्या प्रकल्पांमध्ये स्थिती चिंताजनक आहे. आगामी काळात पिण्यासाठी पाणी राखून ठेवावे लागेल. ग्रामीण भागांमध्येदेखील हीच स्थिती राहणार आहे. टंचाई आराखडादेखील त्या दृष्टीने प्रशासन आखत आहे. एकंदरीतच रब्बीला उत्पादन तुटीचा धोका वाढणार आहे.

    जमिनीमध्ये गहु, हराभरा पेरणीसाठी लागणारी ओल कमी आहे. त्यामुळे विहिरीत असलेल्या थोड्याफार पाण्यावर स्पिंकलरद्वारे पेरणीपूर्व स्थिती तयार करावी लागणार आहे. परतीचा किंवा अवकाळी पाऊस जर आला तर रब्बीसाठी मदतीचा ठरेल. अन्यथा पेरणी क्षेत्र कमी केल्याशिवाय पर्याय नाही.- श्रीकृष्ण पाटील, शेतकरी, कोलवड.

    मोठे प्रकल्प सद्यस्थितीत जलसाठा गतवर्षीचा जलसाठा
    खडकपूर्णा : १८.३२ टक्के ९८.०१ टक्के
    पेनटाकळी : ५३.४६ टक्के ९९.०५ टक्के
    नळगंगा : ४४.११ टक्के ८३.५१ टक्के
    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीकविम्याची भरपाई दिवाळीनंतर की याच महिन्यात कृषीमंत्र्याची माहिती
    कृषी विभागाचे नियोजन
    गहू : ६०हजार ११७ हेक्टर,
    हरभरा : २लाख २५ हजार हेक्टर
    ज्वारी : २०हजार हेक्टर,
    करडई : १हजार हेक्टर
    सूर्यफूल : १०६ हेक्टर
    मका : ३०हजार हेक्टर
    तीळ : १०हेक्टर
    जवस : २० हेक्टर
    इतर पीके २००हेक्टर
    एकूण : ३ लाख ३६ हजार ४५३ हेक्टर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *