• Mon. Nov 25th, 2024

    Lalit Patil Drugs Case: पलायनासाठी मिळाले होते २५ लाखांचे फंडिंग? ललित पाटीलबाबत मोठा दावा

    Lalit Patil Drugs Case: पलायनासाठी मिळाले होते २५ लाखांचे फंडिंग? ललित पाटीलबाबत मोठा दावा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ससून रुग्णालयातून फरारी होत नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला एका महिलेने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. तिला भूषण पाटील याने दिलेले २५ लाख रुपये घेऊन ललितने पुढे पलायन केले. तिच्या घरातून नाशिक पोलिसांनी सात किलो चांदीही हस्तगत केली आहे. या महिलेस पुणे पोलिसांच्या ताब्यात देऊन नाशिक पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

    नाशिकमध्ये एमडी (मॅफेड्रॉन) तयार होणारे कारखाने उद्ध्वस्त झाल्यावर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ललित व त्याच्या टोळीचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांना आदेश दिले. त्यावरून अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत फड, गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने तपास केला. दि. ३ किंवा ४ ऑक्टोबर रोजी ललित नाशिकमध्ये आल्याची माहिती गुन्हे युनिट एकच्या पथकाला चार दिवसांपूर्वी मिळाली. पोलिसांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील एका महिलेच्या घरात तळ ठोकला. ही महिला व ललित यांच्या ‘कॉल्स’मधील माहितीवरून ललितचा माग काढण्यात आला. नाशिक पोलिसही ललितच्या मागावर असताना मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतु, ललित हा पंचवटी परिसरातील एका महिलेच्या घरी मुक्कामी होता. तिचा व त्याचा नेमका काय संबंध आहे, भूषण याने तिच्याकडे कोठून पैसे आणून दिले यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत पुढे पलायन केल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली. त्यामुळे ललित, भूषण यांच्या पलायनात नाशिकच्या महिलेचा हात व फंडिंग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

    ‘सप्लायर्स’ गजाआड

    वडाळागाव व सामनगाव एमडी प्रकरणातील ‘सप्लायर्स’ना एनडीपीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. संशयित पिवाल, पगारे बंधू व गांगुर्डे हे एमडी पुरवठा करीत होते. त्यांना एमडी कोठून उपलब्ध व्हायचे यासंदर्भातील तपास सुरू आहे. ‘छोटी भाभी’चा पती इम्तियाज याला एमडी पुरविणाऱ्या दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यावरून इतर ‘सप्लायर्स’ला शोध सुरू आहे. आतापर्यंत नाशिक पोलिसांनी ड्रग्जप्रकरणी दहा संशयितांना अटक केली आहे. इतर दहा संशयितांची नावे निष्पन्न आहेत.
    पैसे डब्बल करण्याची स्कीम महागात, बनावट पोलिस आले अन् १० लाख घेऊ पळाले, नाशिकमधील प्रकार
    शिंदे गाव एमडी कारखान्यातील संशयित मुंबई व पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण माहिती संबंधित पोलिसांना देण्यात आली. संशयित ललित, भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांची पोलिस कोठडी घेत सखोल तपास करणार आहोत.- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *