सांताक्रूझ येथील कमाल तापमान हे सरासरी कमाल तापमानापेक्षा बुधवारी २.५ अंशांनी अधिक होते. तर मंगळवारपेक्षा १.८ अंशांनी पारा चढला. कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या आसपास होते. मुंबईमध्ये या आधीही ऑक्टोबरमध्ये कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. सन २०१५मध्ये ऑक्टोबरमधील कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. सन २०१८मध्ये त्या खालोखाल ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सर्वसाधारपणे ऑक्टोबरमध्ये सरासरी कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस असते. मात्र, सध्या तरी सरासरी तापमानाइतके तापमान अनुभवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत ३४ ते ३५ अंशांदरम्यानच कमाल तापमानाचा अंदाज आहे. मुंबईचे किमान तापमानही बुधवारी आर्द्रतेमुळे चढे होते. सर्वसाधारणपणे मुंबईत ऑक्टोबरमध्ये २३.९ अंश सेल्सिअस किमान तापमान असते. मात्र, बुधवारी कुलाबा येथे २६.६ तर सांताक्रूझ येथे २६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील किमान तापमान हे सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी अधिक होते.
मुंबईव्यतिरिक्त कोकण विभागात बुधवारी रत्नागिरी येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा २.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. मंगळवारपेक्षा रत्नागिरीच्या कमाल तापमानात २.१ अंशांनी भर पडून हे तापमान ३४.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात उर्वरित केंद्रांवर २४ तासांमध्ये कमाल तापमानात फारसा फरक पडलेला नाही. मुंबईचे तापमान हे राज्यातील कमाल तापमान नोंदले गेले. विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ३६.२ अकोला येथे तर मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण
अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अल्लेप्पी अक्षवृत्तच्या दरम्यान पण लक्षद्विप बेटांच्याही अतिपश्चिमेकडे बुधवारी तयार झालेले कमी दाब क्षेत्र एका आठवड्यात म्हणजे २६ ऑक्टोबरनंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होऊन ओमानच्या दिशेने निघून जाण्याची शक्यता असून महाराष्ट्रावर पावसासाठी त्याचा कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. या क्षेत्राची तीव्रता २१ ऑक्टोबर अधिक वाढेल. या काळात दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या क्षेत्रासोबतच बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या कोलम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर बुधवारी तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात रूपांतर होऊन नंतर पुढील पायऱ्यांमध्ये विकसित होईल. हे क्षेत्र दक्षिण बांग्लादेशकडे दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रामुळेही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले.