• Fri. Jun 12th, 2026

    महाराष्ट्रातील ‘जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र व महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 19, 2026
    महाराष्ट्रातील ‘जल जीवन मिशन २.०’ साठी केंद्र व महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार – महासंवाद

    नागपूर, दि. १९: राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीचे डिसेंबर 2028 पर्यंत ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे तसेच पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचलन आणि देखभाल सुनिश्चित करण्याची प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे सामंजस्य करार पार पडला.

    याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातून दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलिकडेच ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रमास डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली असून या नवीन टप्प्याला ‘जल जीवन मिशन-2.0’ असे संबोधण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यांनी संरचनात्मक सुधारणा, कालमर्यादेचे पालन, योजनांची शाश्वतता आणि नागरीक-केंद्रित सेवांचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी हा सामंजस्य करार पार पडला.

    या करारात काही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करणे, ग्रामीण भागातील नळ पाणी पुरवठा पायाभूत सुविधा पूर्ण करून त्या ग्राम पंचायतींकडे हस्तांतरित करणे तसेच डिसेंबर 2028 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीने ‘हर घर जल’ प्रमाणीकरण साध्य करणे या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय पाणी पुरवठा योजनांचे सक्षम संचालन आणि देखभाल सुनिश्चित करण्यासह जिल्हा व राज्यस्तरावर संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी पेयजल शाश्वतता आराखडा स्वीकारणे या उद्दिष्टांचाही समावेश या सामंजस्य करारात आहे.

    याप्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक मीना, केंद्रीय जल जीवन मिशनचे संचालक व अतिरिक्त सचिव कमल किशोर सोन, सह सचिव (जल) स्वाती मीना नाईक, संचालक प्रदीप सिंह यांच्यासह नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed