मुंबईतील झवेरी बाजारात सोने-चांदीची उलाढाल होते. काळबादेवी परिसरातही छोटे-मोठे असंख्य व्यवसाय आहेत. झवेरी बाजार परिसरातच मुंबादेवी मंदिरही आहे. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी असते. हा भाग प्रचंड दाटीवाटीचा आहे. फेरीवाले, वाहन पार्किंग, दररोज ये-जा करणारी वाहने आणि त्यातच मालाची वाहतूक करणाऱ्या हातगाडी चालकांचा मोठ्या संख्येने वावर असतो. या हातगाड्यांची संख्या मोठी असून, त्या रस्त्यालगतच उभ्या केलेल्या असतात. काही वेळा हातगाडी नेतानाही कामगारांची दमछाक होते. त्यामुळे त्याचा वेग कमी असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. ‘हातगाडी चालकांना बॅटरीवर चालणारी हातगाडी द्यावी का असा विचार होत आहे. त्यामुळे कामगारांकडून मालाची झटपट वाहतूक होईल. त्या गाड्या ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध केली जाईल. तसेच वाहतूक कोंडीही होणार नाही. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येऊ शकतात, यासाठी आयआयटीसह अन्य काही संस्थांकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चाही करण्यात आली आहे’, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
मुंबादेवीत यांत्रिकी वाहनतळ
मुंबईत पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिका बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ उभारत आहे. पाच ठिकाणी वाहनतळे उभारण्यात येतील. मध्य रेल्वेच्या माटुंगा पूर्व स्थानकानजीक आणि मुंबादेवी या ठिकाणी कार्यादेश काढण्यात आले आहेत. मुंबादेवीमध्ये ५४६ मोटारींसाठी पार्किंगच्या जागा उपलब्ध होणार आहेत. त्यावरही सध्या काम सुरू असून, त्यामुळे या परिसरातील पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे.
कोळीवाडा विकासासाठी प्रयत्नशील
‘मुंबईतील कोळीवाडा विकासासाठी सरकार प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली आहे. माहीम कोळीवाडा येथे काही अतिक्रमणे आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवण्याची कामे पुढील आठवड्यानंतर करण्यात येतील आणि कोळीवाड्याच्या विकासाल गती दिली जाईल’, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.