• Sat. Sep 21st, 2024
Lalit Patil: आमच्या मुलाचा एन्काऊंटर करु नका; ललित पाटीलच्या आई-वडिलांनी फोडला टाहो

नाशिक: पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला ड्रग्जमाफिया ललित पाटील याला बुधवारी सकाळी चेन्नईत अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या पथकाने मोस्ट वाँटेड ललित पाटील याला ताब्यात घेतले. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या ड्रग्जच्या व्यापाराबाबत आणि त्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींबाबत खळबळजनक माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर होण्याची भीती व्यक्त केली आहे. या दोघांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ‘आमच्या मुलावर कारवाई करा, पण त्याचा एन्काऊंटर करु नका’, अशी आर्त मागणी केली.

ड्रग्ज कारखान्याला दादा भुसेंचं संरक्षण, ललित पाटीलकडून किती पैसे मिळाले? संजय राऊत एनसीबीकडे तक्रार करणार

पोलिसांनी ललितला अटक केली आहे. आता त्यांनी विचार करुन पुढील निर्णय घ्यावा. यापेक्षा अधिक आम्ही काय सांगणार. सध्या आमची तशी मनस्थितीही नाही, असे ललितच्या आई-वडिलांनी म्हटले. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर पोलीस घरी आले होते. ललित आणि भूषण यांच्या बँकेची पासबूक, पासपोर्ट आणि इतर कागदपत्र शोधण्यासाठी पोलिसांनी घराची झडती घेतली. पोलिसांनी आमचीही चौकशी केली. मात्र, आम्हाला काही माहिती नव्हते तर आम्ही काय सांगणार? आमची मुलं एवढं मोठं ड्रग्ज रॅकेट चालवायची, हे आम्हाला माहितीच नव्हते. ही गोष्ट आम्हाला माहिती असती तर आम्ही त्याला ही गोष्ट चुकीची आहे, असं करु नकोस, हे सांगितले असते. यादरम्यान एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की, राजकीय नेत्यांनी तुमच्या मुलाचा एन्काऊंटर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आम्हाला ललितचा एन्काऊंटर करण्याची भीती वाटते. आम्हाला स्वप्नातही आमची मुलं असं काहीतरी करतील, हे वाटलं नव्हतं. मी एक सरकारी कर्मचारी होतो. ३८ वर्षे नोकरी करुन मी निवृत्त झालो. २०२० पासून ललित तुरुंगात आहे. पण आम्ही त्याला कधी भेटायला गेलो नाही. आम्ही त्याला सोडून दिले होते. अशी मुलं मेलेली बरी. उतारवयात या सगळ्यामुळे आम्हाला मनस्ताप होत आहे. आम्हाला काही झालं तर आमची नातवंड रस्त्यावर येतील. त्यामुळे आता पोलिसांनी आम्हाला त्रास देऊ नये, अशी विनंती ललित पाटीलच्या वडिलांनी रडवेल्या स्वरात केली.

ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात मंत्री दादा भुसे यांचा हात, सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप

दरम्यान, मुंबई पोलिसांकडून आज पत्रकार परिषद घेऊन ललित पाटीलच्या अटकेसंदर्भात माहिती दिली जाईल. मध्यंतरीच्या काळात ललित पाटील आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे असल्याचे आरोप झाले होते. आता पोलीस चौकशीत हे सगळे दुवे पोलिसांच्या हाती लागणार का आणि चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पुणे ड्रग्ज प्रकरण : मुंबई पोलीसांची मोठी कारवाई, ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चेन्नईहून अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed