पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील आरोपींनी १००० बोगस पास तयार केले. यातील १०० हून अधिक पास त्यांनी दांडिया रसिकांना प्रत्येकी ३००० रुपये दरानं विकले. बोगस पास विकत घेऊन १० तरुण दांडियाला पोहोचले. त्यांना आत सोडताना पास तपासण्यात आले. त्यावेळी सुरक्षा रक्षकांना संशय आला. त्यांनी खऱ्या पाससोबत १० पास पडताळून पाहिले. त्यावरील होलोग्राममध्ये फरक होता. १० तरुणांकडे असलेले पास बोगस असल्याचं लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी आयोजकांना माहिती दिली.
या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक हिंडे, मंगेश किर्पेकर, मुकेश खरात यांनी तपास केला. सुरुवातीला दर्शन गोहिल (२४) नावाच्या तरुणाला अचक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून या सगळ्याचा मास्टरमाईंड करण शाहची माहिती मिळाली. शाहनं पोलिसांना या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी चार तरुणांची नावं सांगितली. परेश नेवरेकर, कविश पाटील, संतोष खामकार, स्वप्निल कुंभार अशी त्यांची नावं आहेत.
करण शाह पेशानं ग्राफिक डिझायनर आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी अथर्व कॉलेजमध्ये काम केलं होतं. कविश पाटील, परेश नेवरेकर, स्वप्निल कुंभार यांनी इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. ते अथर्व कॉलेजमध्ये लॅब तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हे कॉलेज भाजप आमदार सुनिल राणेंचं आहे. त्यांच्याकडूनच दांडियाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दांडियाच्या कार्यक्रमाचा पास परेशला मिळाला. त्यानं तो शाहला दिला. त्यानं डुप्लिकेट पास तयार केला. त्यावेळी कविश आणि स्वप्निलदेखील तिथेच होते. करणनं काही मिनिटांमध्येच खऱ्याखुऱ्या पाससारखं दिसणारा पास तयार केला. त्यानंतर संतोष कुंभारच्या मदतीनं दादरच्या प्रिटिंग प्रेसमध्ये पासची छपाई करण्यात आली. या टोळीनं १ हजार पास छापले. ते विकण्याची जबाबदारी दर्शन गोहिलकडे देण्यात आली. त्यानं एका पासचे ३ हजार रुपये घेतले. पास विकून त्यानं ३ लाख मिळवले.