या मोहिमेला प्रतिसाद वाढत असून, लवकरच ती उत्तर महाराष्ट्रात राबविण्याचा मानस शासकीय रक्त्तपेढीने व्यक्त केला आहे. पूर्वी एखाद्या गरजू रुग्णाला रक्त हवे असल्यास त्याला किमान दोन रक्तदाते सोबत घेऊन यावे लागे. या दात्यांनी रक्तदान केले, की रुग्णाला आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध करून दिले जायचे. परंतु, प्रत्येकालाच रक्तदाता शोधून त्याला रुग्णालयात किंवा रक्तपेढीपर्यंत घेऊन जाणे शक्य व्हायचेच असे नाही. रक्तासाठी होणारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची फरपट ओळखून रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून रक्त उपलब्धतेचा पर्याय पुढे आला. त्यातून बऱ्यापैकी रक्ताची गरज भागविली जाऊ लागली. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीला मोठ्या प्रमाणावर शिबिरे घेऊन रक्त संकलित केले जात असले, तरी त्यापैकी काही रक्तपिशव्या ३५ दिवसांच्या आत वापरात न आल्याने वाया जाऊ लागल्या. याउलट मे, जून हा उन्हाळी सुटीचा हंगाम, ऑक्टोबर, नोव्हेंबर या सण-उत्सवांच्या हंगामातदेखील राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवतो. एकीकडे रक्ताचा तुटवडा, तर दुसरीकडे रक्त वाया जाण्याचे प्रकार घडू लागल्याने आता ‘मिशन ब्लड’ ही संकल्पना नाशिकच्या शासकीय रक्तपेढीने अधिक जोरकसपणे पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
…असे आहे मिशन ब्लड
रक्तदानास पात्र असणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या वाढदिवसाला, मित्र, गुरुजन किंवा स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाला रक्तदान करावे याकरिता महाविद्यालयीन तरुण-तरुणी, आरोग्याबाबत अधिक सजग असलेल्या घटकांना प्रेरित करण्यात येत आहे. अशा १५ हजार जणांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्यांना वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान करण्याबाबत प्रोत्साहित केले जाते. त्यास नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे रक्ताची उपलब्धता होऊ लागली आहे. प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असतो. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये ‘बर्थ डे क्लब’ स्थापन करून त्यामध्ये समाविष्ट विद्यार्थ्यांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येते. वाढदिवस असलेले १८ ते २२ वयोगटातील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करू लागले आहेत. (क्रमश:)
महाविद्यालयाच्या आवारात रक्त संकलनाची व्हॅन नेऊन वाढदिवस असणारे विद्यार्थी आणि त्यांच्या मित्रांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे दररोज रक्त मिळत असल्याने ते मुदतबाह्य होण्याचा कालावधीदेखील वेगवेगळा असतो.-डॉ. पुरुषोत्तम पुरी, विभागीय रक्त संक्रमण अधिकारी
रक्त संकलनाची गतवर्षीची राज्यभरातील स्थिती
वर्षभरात झालेली रक्तदान शिबिरे- ३४,६७७
संकलित रक्तपिशव्या- १९ लाख २८ हजार ९४७
मुदतबाह्य झाल्याने वाया गेलेल्या रक्तपिशव्या- १ लाख २३ हजार २८
रक्त वाया जाण्याचे प्रमाण- ६.२७ टक्के