देवगड जामसंडे शहरातील कचरा प्रश्न पेटला आहे. या प्रश्नावरून भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांनी थेट डस्टबिन मोर्चा काढत नगरपंचायतीवर धडक दिली व नगराध्यक्षांना जाब विचारला. ‘कचऱ्याचे नियोजन जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत नगराध्यक्षांना धारेवर धरले. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने न झाल्यास नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा नगरसेवकांनी दिला.
देवगड जामसंडेमधील कचरा प्रश्नावरून सोमवारी भाजप गटनेते शरद ठुकरूल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कचऱ्याचे डस्टबीन घेऊन न. पं. वर मोर्चा काढला.
‘कचऱ्याचे नियोजन जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, सत्ताधारी हाय हाय, साठलेल्या कचऱ्याचे करायचे काय’ अशा घोषणा देत आक्रमक झालेल्या भाजपा नगरसेवक व पदाधिकारी यांनी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना कचरा व्यवस्थापनावरून धारेवर धरले. न. पं .च्या कचऱ्याचा दोन दोन घंटागाड्या बंद आहेत. यामुळे न. पं. हद्दीतील कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी केलेले नियोजन कागदावरच असून साठलेल्या कचऱ्याचे करायचे काय? असा सवाल नगरसेवकांनी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना केला.
कचरा टेंडरमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी यावेळी केला. कचरा प्रश्नाबाबत काय करणार याचे ठोस उत्तर दिल्याशिवाय येथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी घेतला.
कचऱ्यावरून भाजपा नगरसेवक यांनी आक्रमक होऊन नगराध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी भाजपा गटनेते शरद ठुकरूल, उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ. प्रियांका साळसकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. उषःकला केळुस्कर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, उमेश कणेरकर, वैभव करंगुटकर, संजय बांदेकर, व्ही.सी. खडपकर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, आद्या गुमास्ते, सौ. मनिषा जामसंडेकर, सौ. स्वरा कावले आदी भाजपा नगरसेवक उपस्थित होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News