या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बार्शि टाकळीमधील पुष्पाबाई वामनराव जगताप (वय ७५) यांचा मुलगा योगेश केम्ब्रिज चौकातील इस्कॉन मंदिराजवळील पलर्स हौसिंग सोसायटीत येथे राहतो. योगेश जगताप यांचे ट्रॅक्टर; तसेच पार्ट विक्रीचे शोरुम आहे. नवरात्र असल्याने पुष्पाबाई मुलाकडे आल्या. दुपारी अडीचच्या सुमारास त्या बसने हॉटेल कलशसमोर उतरल्या. त्या वेळी योगेश आईला घेण्यासाठी कारने पोहोचला होता.
बसमधून उतरून त्या रस्ता ओलांडत असताना वेगाने मागे येत असलेल्या सिमेंट कॉक्रीट टँकरने पुष्पा यांना चिरडले. त्या ५० फुटांपर्यंत फरफटत गेल्या. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत नेला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात योगेश जगताप यांच्या तक्रारीवरून टँकरचालक निंगराज मलप्पा बिस्गोंडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
मुलासमोरच गेले आईचे प्राण
आई नवरात्रीसाठी येणार असल्याने एकुलता एक असलेला योगेश जगताप कार घेऊन आईची वाट पाहत हॉटेल कलशसमोर उभा होता. बसमधून आई उतरल्यावर त्याने आईला हाक दिली. आई मुलाच्या दिशेने जात असताना वेगाने रिव्हर्स घेणाऱ्या सिमेंट काँक्रिट टँकरने चिरडून, त्यांना फरफटत नेले. डोळ्यांदेखत आई चिरडली गेल्याचे दिसताच योगेशने हंबरडा फोडला.