काय आहे प्रकरण?
वाशी टपाल कार्यालयात डाक विभागातील २० आणि रोजंदारी तत्त्वावरील ४० ते ५० कर्मचारी काम करत आहेत. रोजंदारी तत्त्वावर काम करणारे कामगार पोस्टात येणारे एटीएम कार्ड व इतर कागदपत्रांची विभागणी करण्याचे, त्यांची यादी करण्याचे तसेच बॅग बांधून या बॅगा गाडीमध्ये चढवण्याचे काम करतात. वाशी टपाल कार्यालयामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मोहम्मद अन्सारी याने गेल्या आठवड्यातील वाशी येथील मुख्य टपाल कार्यालयात काम करत असताना स्पीड पोस्टद्वारे वेगवेगळ्या बँकांकडून आलेल्या तीन एटीएम कार्डची चोरी केली. त्यानंतर त्याने त्या एटीएम कार्डचा वापर करून त्याद्वारे ५४,७०० रुपये काढून घेतले.
संबंधीत बँकेने वाशीतील टपाल कार्यालयात ईमेल पाठवून तीन ग्राहकांचे एटीएम कार्ड स्पीड पोस्टद्वारे पोहोचण्याआगोदर त्यांच्या बँक खात्यातून एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्यात आल्याची तक्रार केली. या तक्रारीची वाशी टपाल कार्यालयाने तपासणी केली असता, हे एटीएम कार्ड वाशी टपाल कार्यालयात आल्याचे आढळून आले. मात्र ते पुढील नियोजित ठिकाणी पाठविण्यात आल्याची नोंद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वाशी टपाल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ३ आणि ४ ऑक्टोबर रोजीच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, रोजंदारीवर काम करणाऱ्या मोहम्मद हा काही पत्र घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे त्याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने स्पीड पोस्टद्वारे आलेल्या तीन एटीएम कार्डची चोरी करून त्याद्वारे परस्पर पैसे काढल्याची कबुली दिली. त्यानंतर वाशीतील मुख्य टपाल कार्यालयामधील सुपरवायझर राजीव हुईलगोळ (४३) यांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.