समीर भुजबळ यांच्या निवडीवरुन अजित पवार गटाला टोला
मी दोन तीन दिवसांपू्र्वी वर्तमानपत्रात वाचलं की कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्वीकारला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. फरक एवढाच आहे की तुम्ही ज्यांची निवड केली ते कधी तुरुंगात गेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले हे तुम्हाला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले.
आपल्यापैकी काल अनेकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी क्रिकेटची मॅच बघितली. भारताचा विजय झाला त्या विजयात मुंबईच्या खेळाडूंचं योगदान अधिक होतं. त्यामुळं आपण आनंदी होतो, असं शरद पवार म्हणाले.
आज पक्षाची बैठक एक नवी रस्ता देणारी, आत्मविश्वास वाढवणारी असल्याचा मला आनंद आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कामकाज जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात करतो. काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आहे. एक निवडणूक आयोग आहे तिथं आमचा पक्ष आहे, असं सांगण्यात येतं, सुप्रीम कोर्ट या दोन्ही ठिकाणी खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या मित्रांनी आणला, असं शरद पवार म्हणाले.
मला खात्री आज ना उद्या कधी लागेल, त्यावेळी सामान्य माणसाच्या अंतकरणात बसलेला खरा राष्ट्रवादी कोण याचा निकाल तुमच्या बाजूनं होईल, असं शरद पवार म्हणाले.
मला आनंद आहे, कोर्ट कचेरी चालू आहे, आपल्या पक्षाच्यावतीनं निष्णात वकील काम करत आहेत. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे माहिती घेण्यासाठी कोर्टात उपस्थित असतात. दिवसेंदिवस तुमचं म्हणनं सत्यावर आधारित आहे, हे लोकांच्या समोर येईल याची खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले.
आपल्यासमोर एका बाजूनं संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे सामान्य माणसांमध्ये जायचं आहे. इथं राज्य तुमचं होतं, ते दुसऱ्यांच्या हातात गेलं आहे. आज संपूर्ण देशात कुणी काही म्हटलं तरी भाजपच्या बरोबर जे जाऊ इच्छितात लोक त्यांच्याबरोबर नाहीत. देशपातळीवरील चित्र बदलेल, असं शरद पवार म्हणाले.
देशाचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा, प्रत्येक राज्याची स्थिती लक्षात घ्या, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये भाजप नाही मग आहे कुठं? गोव्यात नव्हता पण आमदार फोडले आणि राज्य घेतलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, आमदार फोडले आणि सरकार घेतलं. गुजरातमध्ये त्यांचं राज्य आहे हे मान्य करतो. कमलनाथ यांचं मध्य प्रदेशातील सरकार पाडलं. भाजप राजस्थानमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये, पश्चिम बंगाल नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News