• Sat. Sep 21st, 2024

एकीच्या पोटात रक्तस्त्राव, दुसऱ्याचे अपेंडिस फुटले, तिसरीच्या जीवाला धोका, रुग्णांसाठी महिला डॉक्टर ठरल्या देवीचे रूप

एकीच्या पोटात रक्तस्त्राव, दुसऱ्याचे अपेंडिस फुटले, तिसरीच्या जीवाला धोका, रुग्णांसाठी महिला डॉक्टर ठरल्या देवीचे रूप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: गर्भ नलिका फुटून पोटात दीड लिटर रक्तस्राव होऊन गर्भवती महिला मृत्यूच्या दारात उभी ठाकलेली… दुसऱ्या रुग्णाच्या पोटात अपेंडिस फुटून आतडे चिकटले. अपेंडिस काढणेही अशक्य झाल्याने रुग्णाची मृत्यूशी झुंज सुरू झाली. तिसऱ्या प्रकरणात पोटातील बाळाने शौच केल्यामुळे मातेच्या जीवाचा धोका वाढतच गेला. त्यात महिलेचे सीझरही दुसरे होते. या तीनही रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्याची कामगिरी पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील पाच डॉक्टरांच्या पथकाने गेल्या आठवड्यात केली. या पथकातील पाचही डॉक्टर महिला असल्याने या तिन्ही रुग्णांना नवरात्रीच्या तोंडावर डॉक्टरांच्या रुपात साक्षात शक्तीचे प्रतीक असलेल्या देवीचाच आशीर्वाद लाभला.

पहिल्या प्रकरणातील अवघे २४ वर्ष वय असलेली सोनाली निपळूंगे (रा. नाईकवाडी, गिरणारे) ही गरोदर महिला पोट दुखते म्हणून मंगळवारी दुपारी बिटको रुग्णालयात दाखल झाली. तपासणी करेपर्यंत तिचे पोट फुगले. गर्भनलिकेत गर्भ राहिल्याने ती फुटून पोटात तब्बल दीड लिटर रक्तस्राव झाला. जीवावर बेतण्याची परिस्थिती निर्माण झाली. महिला मृत्यूच्या दारात उभी होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा काळे, डॉ. प्रज्ञा पाटील, डॉ. प्रेरणा पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. अर्चना बोधले, डॉ. दीपाली पाटील या पाच डॉक्टरांच्या पथकाने सोनाली यांना ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करून घेतले आणि तत्काळ तिच्यावर शस्त्रक्रिया केली. या महिलेच्या पोटात गर्भनलिका फुटून तब्बल दीड लिटर रक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. मोठी जोखीम पत्करून या डॉक्टरांनी सोनाली यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले. तीन बाटल्या रक्त चढवावे लागले. स्टाफ योगेश शिंदे, अक्षय खांदे, प्रतिभा बोराडे, सिस्टर विजया वाकचौरे, स्टाफनर्स अनिता ढाकरगे, रुपाली रोकडे, ज्योती नर या कर्मचाऱ्यांचेही या रुग्णाला जीवदान देण्याच्या कामात मोठे योगदान लाभले.

आजारी पोराच्या वेदना पाहावेना, लेकरासाठी आई धावली, माऊलीच्या किडनीमुळे लेकाला नवे जीवन

दुसऱ्या प्रकरणात रुपेश केदारे (वय ३७, रा. समतानगर, आगरटाकळी) या रुग्णासाठीही बिटको रुग्णालयातील डॉक्टरांची टीम देवासमान ठरली. या रुग्णाचे अपेंडिस पोटातच फुटलेले असताना तो बिटकोत दाखल झाला. आतडे चिकटलेले असल्याने अपेंडिस काढणे जवळजवळ अशक्य असतानाही डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली आणि रुपेशलाही जीवदान लाभले. तिसऱ्या प्रकरणात गौरी शार्दुल (वय २१) या गरोदर महिलेसाठी बिटकोतील डॉक्टर ऐनवेळी देवासारखे धावून आले. या महिलेचे पहिले सीझेरियन झालेले होते. प्रसूतीसाठी ती शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होती. मात्र तिचा रक्तदाब १७० हून जास्त झाला. बाळाने पोटातच शौच केली. अशा परिस्थितीत तिची प्रसूती करणे बाळ आणि माता या दोघांसाठी मोठी जोखीम होती. शेवटी शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रातून व्हेंटिलेटर लावून तिला बिटकोत दाखल केले. थोड्याही विलंबाने अनर्थ होऊ शकला असता. त्यामुळे बिटकोतील डॉक्टरांनी या प्रकरणातही जोखीम उचलत तिचे सीझेरियन करून प्रसूती केली.

कोट:

जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला असताना माझे प्राण वाचविणारे बिटकोतील डॉक्टर देवासारखे धावून आले. ते मला देवासारखेच आहेत.

-सोनाली निपळुंगे, रुग्ण

विद्यार्थ्यांचे रक्तदान आले कामी:

बिटको रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तसाठा कमी होता. त्यामुळे बिटको कॉलेज येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा काळे यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना रक्तदानाचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद देत रक्दान केले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या तीन क्रिटिकल केसेस बिटकोत दाखल झाल्या. त्यांची रक्ताची गरज विद्यार्थ्यांनी दिलेल्या रक्तातून पूर्ण होऊ शकली. डॉ. काळे यांनी जपलेले हे सामाजिक भान आणि रुग्णांवर केलेले उपचार कौतुकास पात्र ठरले.

मीडियाला माहिती का दिली?डाॅक्टरांनी उपचार थांबवले,बाळाचा दुर्दैवी मृत्यू;आईने सुप्रिया सुळेंसमोरच हंबरडा फोडला

Latest Nashik News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed