राज्यसरकारने राज्यभरात नव्याने लागू केलेल्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरसह विभागातील आठही जिल्ह्यातील विविध विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना यांनी एकत्रित येऊन खाजगीकरण व कंत्राटीकरण विरोधी मराठवाडा संयुक्त कृती समिती हा मंच स्थापन केला आहे. समितीच्या माध्यमातून कंत्राटीकरण खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये व्यापक आणि निर्णायक लढाई लढण्यासाठी ३० ऑक्टोबरला महामोर्चाचे आयोजन केले आहे. विभागीय आयुक्तालयावर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
महामोर्चाच्या नियोजनाची बैठक रविवारी गांधी भवनात पार पडली. बैठकीमध्ये विभागातील आठही जिल्ह्यातील शंभरच्या वर प्रतिनिधी हजर होते. बैठकीस प्राध्यापक डॉ. ऋषिकेश कांबळे, अॅड. विष्णू ढोबळे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. मारुती तेगंपुरे, चंद्रकांत चव्हाण, निलेश आंबेवाडीकर, कुणाल खरात, अविनाश सूर्यवंशी, सुनील राठोड, संतोष मगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी आपली भूमिका मांडताना राज्यसरकारच्या धोरणांचा निषेध केला. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकरभरतीकडे दुर्लक्ष करून सरकार खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण बेरोजगारांवर लादते आहे, अशी टिका अनेकांनी केली. बैठकीस डॉ. उमाकांत राठोड, प्रा. ऋषिकेश कांबळे, अॅड. विष्णू ढोबळे, डॉ. मारोती तेगंपूरे, चंद्रकांत चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. रमेश जोशी, अरुण मते, मनीषा बल्लाळ, मुनीर सय्यद यांनी बैठकीसाठी परिश्रम घेतले.
जिल्हावार बैठका घेणार:
खाजगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करत सर्वच प्रतिनिधींनी या धोरणाला तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. विभागामधील आठही जिल्ह्यांमध्ये या संदर्भामध्ये जिल्हावार बैठका घेऊन व्यापक स्वरूपात महामोर्चाची तयारी करण्यात येणार असल्याचे सांगत, मोर्चाला दहा हजाराच्या वर विद्यार्थी उतरवण्याच्या निर्धर करण्यात आला.