• Sat. Sep 21st, 2024

समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना दुःख

ByMH LIVE NEWS

Oct 15, 2023
समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळील टेम्पो अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांना दुःख

मुंबई दि. १५: मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पो अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ने ट्रकला धडक दिल्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले असून याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेट; जखमींची विचारपूस

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला. अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed