• Mon. Nov 25th, 2024

    आई लढली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला बाहेर काढलं; पुणे जिल्ह्यातील घटनेची चर्चा

    आई लढली अन् बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याला बाहेर काढलं; पुणे जिल्ह्यातील घटनेची चर्चा

    पुणे : उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. अशातच आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजातील ७ महिन्याच्या मुलावर बिबट्याने आज पहाटेच्या सुमारास हल्ला केला. मात्र मुलाच्या आईने पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

    आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊ करगळ यांचा मेंढपाळ वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. मात्र मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जागा आली. बिबट्या मुलाला ओढत असताना सोनल यांनी बघितले. त्यावेळी त्यांनी एका हाताने मुलाला ओढत प्रतिकार सुरू केला आणि मुलाला बिबट्याच्या जबड्यातून बाहेर काढलं. तसंच जोरजोरात आरडा ओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर आले आणि त्यानंतर बिबट्या पळून गेला.

    ड्रग्ज कारखान्याला दादा भुसेंचं संरक्षण, ललित पाटीलकडून किती पैसे मिळाले? संजय राऊत एनसीबीकडे तक्रार करणार

    या हल्ल्यात सात महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी सागर विश्वासराव, प्रकाश फुटाणे यांनी मेंढपाळ कुटुंबला धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत.

    दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्या मुलाच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावत बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed