हेरंब कुलकर्णी यांचा खून करण्यासाठी आरोपींना १५ हजार रुपयांची सुपारी देण्यात आल्याचंही पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. आरोपी अक्षय सब्बन याची कुलकर्णी यांच्या सारडा विद्यालय परिसरात तंबाखूजन्न पदार्थांची टपरी होती. हेरंब रामचंद्र कुलकर्णी यांनी महापालिकेत अर्ज केल्याने ती हटवण्यात आली. या रागातूनच आरोपींनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे प्रथम चैतन्य सुनील सुडके (रा. सुडके मळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अक्षय विष्णू सब्बन व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक केली. त्यांचे साथीदार अक्षय (पूर्ण नाव माहिती नाही) व सनी जगदाने हे दोघे फरारी आहेत.
एक आरोपी लपला होता उसाच्या फडात
अक्षय सब्बन याची सीताराम सारडा विद्यालयाजवळ पानटपरी होती. या टपरीला मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांनी हरकत घेतली. त्यानंतर कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून महापालिकेने टपरी हटवली होती. त्यामुळे पोलिसांचा सब्बन याच्यावर संशय होता. पोलिसांनी सब्बन याला ताब्यात घेतलं. परंतु, तो माहिती देत नव्हता. सीसीटीव्हीत हल्लेखोरांचे दुचाकीवर फोटो मिळाले होते. या फुटेजमधील एका आरोपीसारखा दिसणारा मुलगा कोंड्यामामा चौकात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तसंच आरोपी चैतन्य सुनील सुडके याला उसाच्या फडातून ताब्यात घेण्यात आले.
‘माझ्या जगण्याची किंमत…’
पोलीस तपासात हल्लेखोरांबाबत माहिती समोर आल्यानंतर हेरंब कुलकर्णी यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या जगण्याची किंमत…मारणारे ५ जण. प्रत्येकाच्या वाट्याला फारतर ३००० रू आले. इतक्या अल्प रकमेसाठी एखाद्याचा जीव घ्यावासा वाटतो…अनाकलनीय,’ अशी फेसबुक पोस्ट कुलकर्णी यांनी लिहिली आहे.