याबाबत पाचगणी पोलिसांनी सांगितले की, मौजे कासवंड (ता. महाबळेश्वर) येथे दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतात राहत असलेले वयोवृद्ध दाम्पत्य आनंदा दगडू पवार यांच्या राहत्या घराचे कुलूपबंद दरवाजा तेथेच ठेवलेल्या चावीने उघडून ते शेतामध्ये काम करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातील पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाची चैन व तीन तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र व चांदीच्या पट्ट्या, तसेच कर्णफुले असे चोरी करून नेले होते. याबाबत आनंदा पवार यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दिवसा घरफोडी झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी फिर्यादी वयोवृद्ध असल्याने या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पाचगणी पोलिसांना सूचना केल्या होत्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांनी महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे – वरूडे, पोलिस अंमलदार रविंद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे यांचे तपास पथक तयार करून श्वान पथक, ठसे तज्ञ यांना पाचारण केले. ही चोरी कोणी तरी माहितीच्या माणसाने लक्ष ठेवून केलेली असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिस पथकाने तपासाची दिशा फिर्यादींच्या कुटुंबातील नातेवाईकांकडे वळवली.
गोखलेनगर, हडपसर (पुणे) येथे घरफोडी करून चोरीस गेलेले दागिने विक्री झाले असल्याबाबत माहिती मिळाल्याने तपास करीत असताना घरफोडीतील सोन्याचे दागिने हे फिर्यादीची अल्पवयीन नातीने चैनीचे वस्तू खरेदी करण्यासाठी पुणे येथून कासवंड येथे येऊन चोरी केली. चोरीचे दागिने तिचा अल्पवयीन मित्र आणि त्याची आई सुनंदा तुकाराम बनसोडे (वय ३८, रा. गोखलेनगर, जानवाडी, सोमेश्वर मंदिर, पुणे) हिच्या ओळखीने आणि मदतीने गोखलेनगर येथील एका सोनारास विकून त्यातून आलेल्या पैशातून महागड्या कंपनीचा मोबाईल आणि एक स्कुटी मोटारसायकल बुक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अल्पवयीन बालके तसेच आरोपी महिला सुनंदा बनसोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरफोडी करून चोरून नेलेले सहा तोळे वजनाचे सोन्याची चैन आणि मणीमंगळसूत्र, कर्णफुले आणि चांदीच्या पट्ट्या असा सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
पाचगणी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. याबाबत वयोवृद्ध दांपत्यांनी शेतामध्ये काबाडकष्ट करून एक-एक रुपया जमवून केलेल्या सोन्याचे दागिने परत मिळवून दिल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे-वरूडे, पोलिस अंमलदार रविंद्र कदम, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे पाचगणी पोलिस ठाणे यांनी केली.