• Sun. Sep 22nd, 2024

वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?

वाहचालकांना ‘टोल’दिलासा इतक्यात नाहीच, मुंबईच्या वेशीवरील पाचही नाक्यांवर कधीपर्यंत टोल भरावा लागणार?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोलनाक्यांविरोधात आंदोलन छेडले असले तरी मुंबईच्या वेशीवर असलेल्या पाच टोलनाक्यांतून वाहनचालकांची सुटका होऊ शकेल का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण, या पाचही टोलनाक्यांचे कंत्राट हे रद्द न करता येण्याजोगे एकत्रित पद्धतीचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या कंत्राटदाराची करारात ठरलेली रक्कम त्याला मिळाल्याविना टोल रद्द होऊ शकणार नाही, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी सप्टेंबर २०२७पर्यंत मुंबईकरांना शहराच्या वेशीवरील पाचही टोलचा भुर्दंड सोसावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

मुंबई-ठाणे दरम्यान सर्वसामान्यांचा रस्ते प्रवास वेगवान होण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले. पूल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी सन १९९९मध्ये निविदा काढण्यात आली. सन २००२मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले.

‘सन २००२ ते २००९ कालावधीत आयआरबीकडे टोलवसुलीचे काम देण्यात आले. सन २०१०मध्ये आयआरबी समूहातील उपकंपनी असलेल्या एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरला टोलवसुलीचे काम देण्यात आले. एमईपीने एमएसआरडीसीला तीन टप्प्यांत २,२३० कोटी रुपये दिले. यावेळी रद्द करता न येणारा करार करण्यात आला आहे’, असे मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी ‘मटा’ला सांगितले.

हा आक्षेप:

– एमएसआरडीसीला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी दर तीन वर्षांनी टोलवाढीची तरतूद.

– टोलनाक्यांवरील कारभार, वाहनांची मोजदाद करण्याचे काम कंत्राटदाराकडे.

– परिवहन विभागानुसार वार्षिक वाहनवाढ २५ टक्के आहे.

– करारात एमएसआरडीसीने पाच टक्के आणि एमईपीने तीन टक्के वार्षिक वाहनवाढ दर्शवली आहे.

– टोलनाक्यावरील बॅनर जाहिरातीचा दर प्रति नऊ लाख असून टोलनाक्यावर दोन बॅनर लावण्यात येतात. हे उत्पन्न कंत्राटदाराला मिळते, असे आक्षेप स्वप्नील महिंद्रकर यांचे आहेत.

विश्वासार्हता गमावण्याची शक्यता:

मुंबईतील उड्डाणपूल आणि रस्ते देखभाल-दुरुस्ती खर्च म्हणून टोलनाके उभारण्यात आले आहेत. टोलनाक्यांसाठी एकत्रित करार करण्यात आल्याने करार रद्द होऊ शकत नाही. बीओटी तत्त्वावरील प्रकल्पासाठी बँकेकडून कर्जाऊ निधी उभारण्यात आला आहे. टोलकरार रद्द केल्यास अन्य बीओटी तत्त्वावरील प्रकल्पांची विश्वासार्हता गमावण्याची शक्यता आहे, असे एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाक्यांवरून मासिक साधारण ६० लाख वाहनांची वर्दळ होते. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चरने एमएसआरडीसीकडे सादर केलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात वाहनांकडून मासिक ३७.१४ कोटींची टोलवसुली करण्यात आली आहे.

टोलनाका चारचाकी एकूण वाहने एकूण उत्पन्न (कोटी रुपये)

सायन-पनवेल हायवे कॉरिडॉर १५,०७,१२० २०,२३,२३३ ११.४०

पूर्व द्रुतगती मार्ग १०,२०,६१४ १५,०७,४०२ १०.२६

पश्चिम द्रुतगती मार्ग ७,३५,५८५ ११,३०,३६९ ६.९१

ऐरोली पूल ६,६८,२६७ १०,३६,४५० ७.३२

लालबहादुर शास्त्री मार्ग १,४११,७५ २,०५,११९ १.२२

पाच टोलनाक्यांवरून एकत्रित वसुली (रुपये):

चारचाकी : ४०,७२,७६१

एकूण वाहने : ५९,०२,५७३

एकूण उत्पन्न : ३७.१४ कोटी

(स्रोत – एमईपी टोलवसुली अहवाल)

मनसेने चौकी पेटवली:

ठाणे : राज ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन टोल दरवाढ मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला. त्यानंतर मुंबईच्या वेशीवरील टोल दरवाढीविरोधात मनसेने आंदोलन तीव्र केले. वाहनचालकांनी टोल देऊ नये, असे आवाहन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले आणि ठाणे व पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी मुलुंड येथील टोलचौकी पेटवून दिली.

मुलुंड टोलनाका आंदोलन प्रकरण; अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अटक

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed