नेमकी काय संपूर्ण घटना?
अकोला जिल्ह्यातील बोरगांव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेले गाव अनकवाडी. येथील रहिवासी रूपराव जुमळे यांची आपतापा इथे चहा-नाश्ताचे हॉटेल आहे. तर त्यांची पत्नी शेतमजुर आहे. हे दोघेही आज पहाटेच नियमितपणे कामानिमित्य घराबाहेर पडले. त्यांची मुलगी प्रियंका रूपराव जुमळे (१९) हि एकटीच घरात होती. दरम्यान शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुमळे यांच्या घरातून प्रियंका ही पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पडली. याच दरम्यान शेजारी राहत असलेल्या एका महिलेने गोधळी पाण्यात ओली करून तिच्या अंगावर टाकली अन् आग विझवली. या आगीत प्रियंका गंभीररित्या भाजली गेली. स्थानिक ग्रामस्थांनी तिला तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. परंतु वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अन् घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, जुमळे यांच्या घरातील गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला. याच वेळी प्रियंका ही स्वयंपाक घरात असल्याने ती आगीच्या भक्षस्थानी आली. या आगीत प्रियंका गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरी तिच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्यापपर्यंत कळू शकले नाही. या प्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News