याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा शाहूपुरीतील एका शाळेत सहावीमध्ये शिकत होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता तो क्लासवरून घरी आला. त्यावेळी त्याची आई आणि वडील कामावर गेले होते. घराची एक चावी त्याच्याजवळ होती. दरवाजा उघडून तो घरात गेला. तत्पूर्वी त्याने शेजारील काकूंना ‘मला गणपतीच्या आरतीला बोलवा तोपर्यंत मी जेवण करतो,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने किचनमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेतला. दरम्यान, बराचवेळ तो घरातून बाहेर आला नाही, म्हणून त्याचे मित्र त्याला बघायला घरात गेले. त्यावेळी तो त्यांना लटकलेला दिसला. हे पाहताच मुलांनी आरडाओरड केली. काहींनी सुशांतच्या आई-वडिलांना याची माहिती दिली.
सातारा तालुका पोलीस आणि त्याचे आई-वडीलही तातडीने घटनास्थळी आले. त्याच्या गळ्याचा फास काढून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सुशांतची आई धुणीभांडीचे तर वडील गवंडी काम करतात. हे दोघे दररोज सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडतात. नेहमीप्रमाणे सुंशातही क्लासला जाऊन आला होता. घरात कसलाही वाद झाला नव्हता. असे असताना त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, या विचाराने त्याच्या घरातल्यांना अस्वस्थ करून सोडलं आहे. शाळेत किंवा गावात त्याची कोणासोबत भांडणे झाली होती का, त्याला कोणी रागवले का? याचा आता पोलीस तपास करत आहेत. योगेश पोपट कांबळे (वय ३७, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून या प्रकरणी पोलीस नाईक प्रवीण वायदंडे तपास करीत आहेत.