• Mon. Sep 23rd, 2024
बाप्पांचा वेगळाच थाट; चक्क झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना, तरुणांच्या भन्नाट कल्पनेचे होतयं कौतुक

अहमदनगर: गणेश उत्सव तसा प्रत्येकाचा आवडता सण आहे. अगदी अबाल, वृद्ध सर्वजण गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करत असतात. गणेशोत्सव म्हटलं की गणपती मूर्ती कशी आणि कोणत्या पद्धतीची असावी, त्याची सजावट कशी असेल. आपला गणपती हा सगळ्यांपेक्षा वेगळा असावा, याची तयारी अगदी सुरुवातीपासूनच केली जाते. प्रत्येक जण गणेशोत्सवामध्ये वेगळेपण जपत असतो. असाच एक आगळावेगळा गणेशोत्सव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात या ठिकाणी साजरा केला जात आहे. तुम्हाला नवल वाटेल गणपती बाप्पा चक्क झाडावर बसवले आहेत.
शंभर वर्षांपासून भजनाच्या गजरात बाप्पांना निरोप देतात; ‘या’ गावाने जपलीय एकत्र मिरवणुकीची परंपरा
विसापूर-कोरेगाव ता. श्रीगोंदा येथील अवलिया युवकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न केलाच. परंतु त्याही पुढे जाऊन त्याने चक्क शेतात झाडावर गणेश प्रतिष्ठापना केली आहे. कोरेगाव येथील सागर थोरात आणि राजन थोरात या युवकांनी मागील वर्षीही अशाच प्रकारे बाभळीच्या झाडावर गणेश प्रतिष्ठापना करून अनोख्या पद्धतीने घरगुती मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला होता. यावेळी त्यांनी याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा देखाव्यात समाविष्ट केला आहे. या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी लहान शेततळे तयार करण्यात आले असून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

अमेरिकेत महाराष्ट्र मंडळांकडून गणेशोत्सव साजरा

सर्व व्यवस्था पर्यावरण पूरक स्वरूपात करण्यात आली आहे. सागर थोरात कोरेगावमधील साबळे मळ्यात राहत असून त्याने छावा ग्रुपच्या युवकांचे सहकार्याने शेतात हा उपक्रम राबविला आहे. या उत्सवात त्याला घरातील सर्व सदस्य साथ करत आहेत. नगर-दौंड महामार्गावरील चिखली येथून कोरेगाव चार किलो मीटर अंतरावर आहे. अशा प्रकारचा गणेश उत्सवातील हा आगळावेगळा उपक्रम म्हणजे गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच आहे. गणेश भक्तांचे पाऊले गावाकडून आपोआप सागर थोरात यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed