राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्याने रोहित पवार यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी असल्याचे दिसून येते. यातून ते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अधिक जवळ गेले आहेत. पक्ष फुटायच्या आधीपासूनच आमदार रोहित पवार राज्यात फिरत आहेत. राज्यातील आणि देशातील विविध विषय आणि राजकारणावरही भाष्य करीत आहेत. यातून त्यांची वेगळी प्रतिमा समोर येत असताना विरोधकांकडून टीकाही सुरू झाली.
पक्षात फूट पडल्यानंतर रोहित पवार आणखी आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीका करताना पक्षातून फुटलेल्यांचाही ते संधी मिळेल तसा समाचार घेतात. यातूनच त्यांच्यावरही थेट टीका सुरू झाली. तर दुसरीकडे त्यांचे समर्थकही आक्रमकपणे कामाला लागल्याचे दिसते. पूर्वी अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले होते. आता तसे फलक रोहित पवार यांचे झळकत आहेत.
दरम्यान, रोहित पवार यांचा २९ सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यामुळे जामखेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छांचे फलक लागले आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. जामखेड शहरातील बीड रोडवर असे फलक दिसून येत आहेत.
रोहित पवारांच्या पुण्यातील फलकाबाबत काय म्हणाले होते अजित पवार?
रोहित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत लागलेल्या फलकावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘कोणाचे किती बोर्ड लागेल यावर मी बोलणार नाही, आता सर्वजणच मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावणार आहे, कुणीच बॅनर लावायला मागे पुढे पाहणार नाही. पण जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर गाठत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही,’ असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.