शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीसाठी अजित पवार रविवारी (२४ सप्टेंबर) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर होते. पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या दरम्यानचा चौक ४.४१३ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामासाठी केवळ एका मंत्र्याची सही राहिली आहे. ते झाले, की लगेच काम सुरू होईल. स्वारगेट ते निगडी हे कामही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’
शरद पवारांसोबतच्या प्रफुल्ल पटेल यांच्या छायाचित्रावर बोलण्यास त्यांनी नकार देत, विकासकामांसंदर्भातील प्रश्न विचारा, असे स्पष्ट केले.
‘राज्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी मी १५ दिवसांतून एकदा आढावा बैठक घेत आहे. अडचणी दूर करून ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे,’ असेही पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंचवड येथे मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर निगडी, यमुनानगर, तळवडे, चिखली, ताम्हाणे वस्ती, बोऱ्हाडेवाडी, मोशी, चऱ्होली, दिघी, भोसरी, लांडेवाडी, संत तुकारामनगर, दापोडी, पिंपरी गाव, चिंचवड, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, प्राधिकरण, वाल्हेकरवाडी, मामुर्डी, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निखल, नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव येथील गणेश मंडळांना भेट देऊन आरती केली.