“कोणाचे किती बोर्ड लागेल यावर मी बोलणार नाही, आता सर्वच मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लावणार आहे, कुणीच बॅनर लावायला मागे पुढे पाहणार नाही. मात्र जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर गाठत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आता सर्वजण भावी मुख्यमंत्री म्हणून आपले बॅनर लावतील. कोणीच मागे राहणार नाही. मी मागेच म्हणालो होतो की, कुणी कोणाचे फ्लेक्स लावायचे याबाबत मी काही बोलणार नाही. या फ्लेक्स लावल्याने फक्त कार्यकर्त्याला समाधान मिळते. मात्र जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर गाठत नाही तोपर्यंत हे स्वप्नच असल्याचे म्हणता येईल.
माझं सध्या काम सुरू आहे. मला विचारायचे असेल तर विकासावर विचारा. या शहराने मला १९९१ ला खासदार केले. तेव्हापासून मी फक्त कामच करतो आहे. कामावर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे भल्या पहाटेपासून मी कामाला सुरुवात करतो. अलीकडे आपल्याकडे वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे. मी त्याकडे लक्ष देत नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पडळकरांवर निशाणा साधला.
स्वत:च्याही मुख्यमंत्रिपदावर स्पष्टीकरण
‘बॅनर लावून मुख्यमंत्री अथवा पालकमंत्री पद मिळत नाही. निवडणुकीत ‘मॅजिक फिगर’ गाठणाऱ्या पक्षालाच मुख्यमंत्रिपद मिळते. मुख्यमंत्री होणे हा नशीबाचा भाग आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाविषयीच्या चर्चांना रविवारी पूर्णविराम दिला. ‘राज्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लावण्याचे नवीन ‘फॅड’ आले आहे. मात्र, आम्ही कोणीही असे बॅनर लावण्यास सांगत नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.