• Sat. Sep 21st, 2024

उकडीचे मोदक खाताहेत भाव; रोजची उलाढाल लाखोंच्या घरात, जाणून घ्या किंमती…

उकडीचे मोदक खाताहेत भाव; रोजची उलाढाल लाखोंच्या घरात, जाणून घ्या किंमती…

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : गणेशोत्सवाचा उत्साह जसजसा वाढतोय तसतशी मोदकांची मागणीही वाढत असून, त्यातही उकडीचे मोदक चांगलाच भाव खात आहेत. त्यामुळे उकडीच्या मोदकांची उलाढाल सध्या लाखोंच्या घरात पोहोचली असून, उकडीचे मोदक बनविणाऱ्या अनेक गृहिणींना चांगले उत्पन्न मिळत आहे.

कोकणात प्रसिद्ध असलेल्या उकडीच्या मोदकांची मागणी उर्वरित महाराष्ट्रातदेखील वाढत आहे. गणेशोत्सवातील वाढत्या मागणीमुळे उकडीच्या मोदकांनी गृहिणींना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला असून, काही महिला मिठाईच्या दुकानांनादेखील या मोदकांचा पुरवठा करीत आहेत. मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यात चॉकलेट, काजू केशर, गुलकंद, राजभोग, पिस्ता, मॅँगो आणि इतर मोदकांचा समावेश आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीच्या उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी आहे. उकडीचे मोदक हा अत्यंत कुशलतेने बनवायचा पदार्थ असल्याने अनेकांचा कल ते रेडिमेड आणण्याकडे वाढत आहे. त्यामुळेच शहरात गणेशोत्सवात उकडीचे मोदक तयार करून विकणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. गणेशोत्सवाच्या अवघ्या दहा दिवसांत एकट्या नाशिक शहरात हजारो उकडीचे मोदक विकले जातात. पाच हजारांहून अधिक महिलांना यातून रोजगार उपलब्ध झाला असून, दोन हजारांहून अधिक व्यावसायिकही या मोदकप्रेमातून तयार झाले आहेत.

कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात तांदूळ आणि नारळाचे उत्पादन होत असल्याने उकडीचे मोदक तेथील पारंपरिक पदार्थ आहे. तेथे दर महिन्याच्या चतुर्थीला गणरायाला उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखविण्याची प्रथा आहे. गूळ, खोबरे, खसखस, जायफळ, वेलची यांचे सारण आणि इंद्रायणी व आंबेमोहर तांदळाची पिठी यापासून उकडीचे मोदक तयार करण्यात येतात.

‘अॅप’वरून मोठी मागणी

उकडीच्या मोदकांची किंमत २१ रुपये ते ५१ रुपये प्रतिनग आहे. त्यात सुकामेवा आणि केशरयुक्त मोदकांचा समावेश आहे. काही मोदकांसोबत तुपाचे पाकीटदेखील दिले जाते. अनेक गृहिणी, कुटुंबीय सोशल मीडियावर आपल्या मोदकांची जाहिरात करतात. ‘माऊथ पब्लिसिटी’सह फूड डिलिव्हरी अॅपचाही मोठा वापर केला जातो. त्यामुळे अॅपद्वारेही मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविली जात आहे.
निर्माल्याचा दुर्गंध? छे, तयार होणार सुगंधी अत्तर! नीरी-नागपूर मनपाची सकारात्मक चर्चा
आम्ही मागणीनुसार मोदक देतो. गणेशोत्सवादरम्यान आम्ही दररोज शंभरहून अधिक मोदकांचे उत्पादन करतो. हे मोदक बनविणे वेळखाऊ प्रक्रिया आहे. परंतु, जो त्यांची चव चाखतो त्याच्या चेहऱ्यावरील समाधान फार मोलाचे आहे.-संध्या जोशी, मोदक उत्पादक

माझ्या आईला हे मोदक बनविण्याची हातोटी माहिती आहे. ती इतर रंग न वापरता मोदक बनविते. आम्ही ड्रायफ्रूट आणि केशर वापरतो. हे मोदक तुपासह गरमागरम सर्व्ह केले जातात.-गणेश कुलकर्णी, मोदक व्यावसायिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed