• Wed. Mar 11th, 2026
    Kolhapur Crime : क्रिकेटपासून ते गावच्या निवडणुकीपर्यंत खुन्नस, जुन्या वादातून पुन्हा फूट पडली; मित्रानेच जीवलग मित्राला भरचौकात संपवलं

    Kolhapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच कोल्हापुरात एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    कोल्हापूर मित्राने मित्राची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापुरात एका मागे एक हत्या झाल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. काल सोमवारी सायंकाळी कोल्हापूरच्या तारदाळ येथे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वाद विकोपाला जाऊन ही घटना घडली आहे. यामध्ये एका मित्राचा मृत्यू झाला असून हल्लेखोर देखील जखमी झाला आहे. या घटनेनंतर तारदाळ गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शहापूर पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

    नेमकं काय घडलं?

    कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मध्यवर्ती नागनाथ मंदिर चौकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वादातून चांगले मित्र असलेल्या दोन तरुणांमध्ये फूट पडली. या वादातूनच झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली, तर हल्ला करणारा स्वतः देखील जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी सायंकाळी घडली. जावीद रशीद मुजावर (वय 22, रा. तारदाळ) असं मृत तरुणाचं नाव असून यश तानाजी गायकवाड (वय 19, रा. तारदाळ) हा जखमी असून त्याला पोलिसांनी उपचाराअंती ताब्यात घेतलं आहे.
    Maharashtra TimesNashik Crime : डॉक्टर महिलेशी संबंध, डॉ. मनीषा जेजुरकरांचा मानसोपचार तज्ञ नवऱ्यानेच जीव घेतला, बहिणीचे गंभीर आरोप; पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय

    भरचौकात रक्तरंजित हल्ला

    काल सोमवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास नागनाथ मंदिरासमोरील पानपट्टीसमोर जावीद आणि यश यांच्यात जुन्याच कारणांवरून पुन्हा वाद सुरू झाला. या वादाचे रुपांतर काही क्षणांतच झटापटीत झाले आणि दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू झाली. प्राथमिक माहितीनुसार, या झटापटीदरम्यान जावीदने चाकू काढून यशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यशने चाकू हिसकावून घेत जावीदवर सपासप वार केल्याचे पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. या अनपेक्षित हल्ल्याने गांगरलेला जावीद गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी तेथून पळत सुटला. तो नागनाथ चौकातून सुमारे 200 मीटर अंतरावरील गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत गेला. मात्र, यशने त्याचा पाठलाग करत तिथेही पोहोचून त्याच्यावर पुन्हा वार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

    छातीत, मानेत, डोक्यात वर्मी घाव

    यशकडून झालेल्या या हल्ल्यात जावीदच्या छातीवर, मानेवर, पाठीवर, पोटातील बाजूस तसेच डोक्यात आणि हातावर गंभीर स्वरूपाचे वार झाले. काही क्षणांतच तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केलं. यशला मात्र प्राथमिक उपचारानंतर शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
    Maharashtra TimesJalgaon News : ‘निलेशचा मोबाईल बंद आहे, त्याला उठवा’; चुलत भावाने दरवाजा उघडताच भयंकर दृश्य, पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं

    क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत वाढत गेली खुन्नस

    जावीद आणि यश हे दोघेही पूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी गावातील क्रिकेट सामन्यादरम्यान किरकोळ कारणावरून दोघांत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोघे वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारात कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते आणि त्यावेळीही निवडणूक कामातून त्यांच्यात शब्दांना शब्द लागून वाद पेटल्याचे सांगितले जाते. काही ज्येष्ठांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा वाद वरकरणी मिटला असला तरी दोघांमध्ये खुन्नस कायम राहिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

    व्यावसायिकांनी दुकाने बंद केली; पोलीस बंदोबस्त कडक

    ही घटना गावातील वर्दळीच्या चौकात घडल्याने काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला. परिसरातील व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने घाईघाईने बंद केली. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, दोन गटांमध्ये तणाव उसळू नये, यासाठी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा या प्रकरणी मृताचे वडील रशीद ताजुद्दीन मुजावर (वय 45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात ट्रकचालकाला मारहाण करून शेण खायला घातले; तृतीयपंथीसह दोन गोरक्षकांना अटक
    दरम्यान या घटनेमुळे तारदाळ आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या वैमनस्यातून पुढे येणाऱ्या तरुणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल ग्रामस्थांमध्ये गंभीर चर्चा सुरू आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा