• Sat. Sep 21st, 2024
तलाठी भरतीनंतर आता ‘कृषी’ परीक्षेतही हायटेक कॉपी; नाशकातील ‘ते’ परीक्षा सेंटर पुन्हा चर्चेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तलाठी भरती प्रक्रियेत पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या संशयितांना अटक केल्याची घटना ताजी असताना, आता कृषी विभागाच्या भरतीतही कॉपीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पुन्हा म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीतील त्याच परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. इलेक्ट्रॉनिक साधनांसह संशयित परीक्षार्थ्याला अटक केली आहे.

म्हसरूळ परिसरातील पुणे विद्यार्थी गृह येथे शुक्रवारी (दि. २२) दुपारी घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध पदांच्या ऑनलाइन परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्य घेत परीक्षा केंद्रात गेलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सूरज विठ्ठलसिंग जारवाल (वय २३, रा. जारवालवाडी, बदनापूर, जालना) असे संशयिताचे नाव आहे. सूरज हा दुपारी साडेबारा ते अडीच या कालावधीतील परीक्षेसाठी केंद्रात पोहोचला. तिथे सुरक्षारक्षकांनी पूर्वसूचना दिल्यानंतरही सूरजची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे त्याची विचारणा करताच त्याने पळ काढला. इतर सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्याला ताब्यात घेतले. तेव्हा, त्याच्याकडे मोबाइल व पायातील सॅन्डलमध्ये एक डिव्हाइस लपविल्याचे दिसले. यासह कपड्याच्या आतील बाजूला एक पाकीट लावून, फोटो काढण्यासाठी पाकिटाला छिद्र असल्याचेही दिसले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. म्हसरूळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिराने सूरजविरोधात फसवणुकीसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानुसार त्याच्या साथीदारांचा शोध म्हसरूळ पोलिस घेत आहेत.

तलाठी भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघड, एकजण ताब्यात

– खिशात मोबाइल, सॅन्डलमध्ये डिव्हाइस

– शर्टाच्या आतील कपड्याला पाकीट, त्याला छिद्र

– मोबाइलमध्ये विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर आढळले

– सूरजला उत्तरे कोण सांगणार होते, त्याचा शोध सुरू

परीक्षार्थ्यांनो, गैरप्रकार टाळा:

तलाठी भरतीमध्ये कॉपी झाल्यामुळे राज्यभरातून टीका होत आहे. राजकीय वर्तुळातही भरती स्थगित करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे चिकाटीने अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॉपीमुळे काही टोळ्यांवर गुन्हे दाखल झाले असून, शासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. तलाठीसह कृषी भरतीमध्येही हा प्रकार पुढे आल्याने पोलिसही सतर्क झाले आहेत. परिणामी, इतरांचे शैक्षणिक व स्वत:चे कायदेशीर नुकसान टाळण्यासाठी गैरप्रकार न करण्याचे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

Nagpur Rain: हवामान खात्याकडून मोठी चूक, रडार असूनही अचूक इशारा नाही अन् नागपूरकरांचे हाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed