• Sat. Sep 21st, 2024

लालबागचा राजासह ‘या’ मानाच्या गणपतींना अकोल्यातून जानवे; चेंडके दाम्पत्याचा सेवाभाव

लालबागचा राजासह ‘या’ मानाच्या गणपतींना अकोल्यातून जानवे; चेंडके दाम्पत्याचा सेवाभाव

नीरज आवंडेकर, अकोला : घरी गणपतीची स्थापना केल्यानंतर जानवे आणण्यासाठी गेले तर केवळ दोरा तेवढा मिळाला. शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार जानवे हवे म्हणून शोध घेतला तर गावात मिळाले नाही. कुणीतही कोल्हापुरातून प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. ध्येयाचा पाठलाग करताना त्यांनी हे प्रशिक्षण घेतले. दहा वर्षांपासून आता अकोल्यातून मुंबईतील लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेट हलवाई, सिद्धीविनायकासह देश-विदेशातील गणपतींसाठी अकोल्यातून जानवे जात आहेत.

श्याम आणि राधा चेंडके हे दाम्पत्य मागील दहा वर्षांपासून अकोल्यातून हा सेवाभाव जपत आहेत. श्याम हे खासगी कंपनीत नोकरीला तर राधा या गृहिणी आहेत. श्याम यांनी तीन दिवस कोल्हापुरात जानवे तयार करण्याचे रितसर प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला घरच्या गणपतीसाठी त्यांनी जानवं बनविले. हळूहळू शेजारून मागणी होऊ लागली. मागणीत वर्षागणिक वाढ होऊ लागली. मुलाने आपण लालबागच्या राजासाठी जानवे तयार करू, असा विचार मांडला. याला मूर्त रूप देण्यासाठी श्याम यांनी मुंबईतील लालबागचा राजाच्या मंडळाशी संपर्क साधला. त्यांनी सोन्याचे जानवे घालत असल्याची माहिती दिली. श्याम यांनी त्याना सुती जानव्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी होकार देताच लालबागच्या राजासाठी जानवे पाठविले. विसर्जनादरम्यान हे जानवे त्यांना स्पष्ट दिसून आले. उत्साह दुणावला. नंतर त्यांनी पुण्याचे दगडूशेठ हलवाई , तुळशीबागचा गणपती, मुंबईचा सिद्धिविनायक, गिरगावचा राजा, अंधेरीचा राजा, चौपाटीचा राजासह चंद्रपूर, रत्नागिरी आणि विदेशातही जानवे पाठविले. अगदी नि:शुल्क ही सेवा चेंडके दाम्पत्य करीत आहेत.
सैलानी बाबांच्या दर्ग्यात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना, छत्रपती संभाजीनगरात तीस वर्षांपासून सलोख्याची परंपरा
सिद्धिविनायकासाठी ३६५ जानवे

मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीसाठी चेंडके दाम्पत्य वर्षभराचे ३६५ जानवे पाठवितात. सिद्धिविनायकाला रोज तर पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला चतुर्थीला जानवे बदलवितात.

जानव्याचे महत्त्व

शास्रीय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जानव्यात नऊ दोरे असतात. प्रत्येक दोऱ्यावर विविध देव पीरत असतात. कमरेखाली जानवे जाऊ नये असेही संकेत आहेत. जानव्याची ब्रह्मगाठ दिलेली असते. ही अद्वैताची गाठ म्हणजे जीव व ब्रह्म एकच आहे हा सिद्धांत सांगते. यात स्वपासून, सृष्टी, वेद, ऋतू, काळ, पंचेंद्रिय, कला, नशस्त्र, पंचमहाभूत आदींचा समावेश असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed