मध्य रेल्वेनं ट्विटरवर माहिती देताना सांगितंल की, एप्रिल ते ऑगस्ट या या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भंगार विक्रीतून १६०.६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रेल्वेला या कालावधी दरम्यान १३०. १७ कोटी रुपये कमाईची अपेक्षा होती. मात्र, रेल्वेच्या अपेक्षेपेक्षा जवळपास ३० कोटी अधिक रेल्वेला मिळाले आहेत. रेल्वेच्या अपेक्षेपेक्षा २३. ४० टक्के अधिक कमाई भंगार विक्रीतून झाली आहे.
मध्य रेल्वेनं स्क्रॅपमध्ये कशाची विक्री केली?
मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑगस्टच्या दरम्यान मेल एक्स्प्रेस गाड्यांचे १६८ डबे स्क्रॅपमध्ये काढण्यात आले. याशिवाय मालगाड्यांचे ८३ डबे, ८ एएमयू डबे, आठ डिझेल इंजिन, ४ इलेक्ट्रिक इंजिन आणि इतर साधनांची विक्री करुन मध्य रेल्वेनं १६०. ६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
३५५ कोटींच्या कमाईचं लक्ष्य
मध्य रेल्वेनं यंदाच्या वर्षात भंगार विक्रीतून ३५५ कोटींची कमाई करण्याचं निश्चित केलं आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान रेल्वेला १६०.६४ कोटींची कमाई झालेली आहे. उर्वरित कालावधीत मध्य रेल्वे भंगार विक्रीतून लक्ष्य पूर्ण करणार का हे पाहावं लागणार आहे.
मध्य रेल्वेनं शून्य भंगार धोरणानुसार राज्यातील प्रमुख स्थानकांमधील भंगार विक्री केली आहे. रेल्वे स्थानकांसह,कार्यशाळांमधील भंगार विक्री केल्यानं रेल्वेला दुहेरी फायदा झाला आहे.भंगार विक्री केल्यानं आर्थिक कमाई झाली याशिवाय रेल्वेचा परिसर देखील स्वच्छ झाला आहे. मध्य रेल्वेप्रमाणं देशातील इतर विभागांद्वारे देखील भंगारची विक्री शून्य भंगार धोरणानुसार केली जात आहे.