गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशीपासूनच गर्दी होत असल्याचा ‘शोध’ लावून वाहतूक पोलिसांनी मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवर बुधवारपासूनच निर्बंध घातले आहेत. पोलिसांच्या या जाचक निर्बंधांमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. मध्यवस्तीत गणपती प्रतिष्ठापनेसाठी निघालेल्या मिरवणुकांमुळे मंगळवारी आधीच बहुतांश रस्ते बंद असताना, आता त्यात पोलिसांच्या अचानक दुसऱ्या दिवशीपासून वाहने बंद केल्याने ये-जा करायची नाही का, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. किमान हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.
सर्व वाहनांसाठी शिवाजी रस्ता बंद
– शिवाजीनगरवरून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जंगली महाराज रस्ता- टिळक चौक-टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा अथवा कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौक मार्गे नेहरू रस्त्याचा वापर करून स्वारगेटकडे जावे.
– अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद
– बेलबाग चौक ते रामेश्वर चौक हा मार्ग २० सप्टेंबरपासून ते गणपती विसर्जनापर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहील.
एकेरी वाहतूक शिथिल
गणेशोत्सव काळात २० ते २७ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री गर्दी संपेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते मनपा, जंगली महाराज रस्त्यावरील कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश तात्पुरत्या स्वरुपात शिथिल केले जाणार आहेत.